४ मार्चपासून करूळ घाटातून एकेरी एसटी वाहतूक

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटातून मंगळवार ४ मार्च पासून वैभववाडी कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक सुरु करण्याचे आदेश विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहेत.त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. २४ फेब्रुवारीपासून करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरु झाली आहे. मात्र आठ दिवस होऊनही सर्वसामान्य प्रवाशांचे प्रवासाचे मुख्य साधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या एस टी बस सुरु झाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत प्रसार माध्यमातून आवाज उठवल्यानंतर एस. टी. महामंडळाने मंगळवार पासून एस टी बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

करूळ घाटाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी २२ जानेवारी २०२४ पासून घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना कोल्हापरकडे जाण्या येण्यासाठी भुईबावडा, फोंडा, अनुस्कुरा घाटातून वाहतूक सुरु होती. यामुळे प्रवाशांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत होता. तर भुईबवाडा घाटातून सप्टेंबर २०२४ पासून सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत एस टी बस वाहतूक सुरु असून रात्रीच्यावेळी एस टी वाहतूक रस्ता सुरक्षितेच्या कारणामुळे बंद आहे. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे.त्यामुळे घाटातून वाहतूक सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती.

error: Content is protected !!