सिंधुदुर्गात पत्रकार आक्रमक

दोडामार्गातील त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करा अन्यथा आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : अनधिकृत वाळूसाठ्याचे फोटो काढल्याचा राग धरून पत्रकारांना मारहाण करीत कोंडून ठेवणे हा प्रकार निषेधार्य आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ असा प्रकार कदापी खपवून घेणार नाही. या प्रकरणात महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाई करीत सकारात्मक भूमिका घेतली आहे. परंतु पोलीसानी गुन्हे दाखल झालेल्या दोन्ही संशयितांना अद्याप अटक केलेली नाही. पुढील आठ दिवसात अटकेची कारवाई झाली नाही तर जिल्ह्यातील पत्रकारांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी दिला आहे.

दोडामार्ग तालुक्यातील तीन पत्रकारांना मारहाण करीत कोंडून ठेवण्याचा प्रकाराबाबत अध्यक्ष तोरसकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा सचिव बाळ खडपकर, गणेश जेठे, राजन नाईक, सुहास देसाई आदी उपस्थित होते. यावेळी तोरसकर यांनी, गॅस पाईप लाईन गळती संदर्भात माहिती घेण्यासाठी माटणे येथे गेलेल्या या तीन पत्रकारांना वाळू साठा दिसल्याने त्यांनी त्याचे फोटो काढले. त्याचा राग आल्याने नवनाथ नाईक पिता पुत्राने त्यांना मारहाण करीत कोंडून ठेवले. सुदैवाने दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण तेथून जात होते. त्यामुळे तिघांतील एका पत्रकाराने त्यांना घटना सांगितली. त्यामुळे त्यांनी त्याची सोडवणूक केली. परिणामी पुढील अनर्थ टळला, असे सांगितले.

ही घटना समजताच आपण दोडामार्ग येथे जावून तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली. यावेळी दोडामार्ग पत्रकारांनी एकजूट दाखवत सबंधित संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत आपण पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी सबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्वासित केले आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. तसेच जिल्हा पत्रकार या तिन्ही पत्रकारांच्या पाठीशी आहे. बीड जिल्ह्याप्रमाणे गुंड प्रवृत्ती जिल्ह्यात फोफावू पाहत आहे. पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांवर हल्ले केले जात आहेत. हा प्रकार जिल्हा पत्रकार संघ कधीही खपवून घेणार नाही. संशयितांना शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.

या प्रकरणात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी चांगली भूमिका घेतली. त्यांनी प्रांताधिकारी यांना सांगून अनधिकृत असलेला वाळू साठा जप्त करून घेतला आहे. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचीही आम्ही भेट घेतली. त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासित केले आहे. परंतु या प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या दोघानाही अटक झालेली नाही. आता हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. पुढील आठ दिवसांत या दोन्ही संशयितांना अटक न केल्यास जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, असे तोरसकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!