जिल्ह्यातील निवड यादीत कुमार,मिश्रा,चौहान आदी परप्रांतीय नावांचा समावेश असल्याने मनसे पदाधिकारी संतप्त
कुडाळ (प्रतिनिधी) : अलीकडेच भारतीय डाक विभागात क्लेरिकल स्टाफ पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. दहावी उत्तीर्ण किमान पात्रता असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील अनेक मराठी स्थानिक उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेल्या पहिल्या नऊ जणांच्या निवड यादीमध्ये सात परप्रांतीय उमेदवारांचा निवड यादीत समावेश असल्याने मनसेने संपूर्ण भरती प्रक्रियेबाबत सवाल उपस्थित केले आहेत. मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष अमोल जंगले,राजेश टंगसाळी,आपा मांजरेकर,वैभव धुरी,संतोष सावंत आदी मनसे शिष्टमंडळाने डाक श्री कोले यांची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली व निवड प्रक्रियेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या. यावेळी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मराठी भाषेचे ज्ञान नसणारे उमेदवार जिल्हावासीयांना कसली सेवा देणार, उमेदवार निश्चिती करताना राज्यात प्रशासकीय कारभाराची भाषा मराठी आहे हे माहीत नव्हते का, मराठी तरुणांच्या हक्काच्या जागांवर भरती प्रक्रियेबाबत डाक विभागाकडून चुकीची धोरणे अंमलात आणली जात असताना आपले खासदार झोपा काढत होते का असे सवाल उपस्थित करत खंत व्यक्त केली. तर डाटा एन्ट्री कम क्लेरीकल कामासाठी मराठी तरुण पात्र ठरत नाहीत का असा रोष व्यक्त करत परराज्यातील उमेदवारांना हजर करून घेतल्यास आमच्याशी गाठ आहे असा इशारा माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला. डाक अधीक्षकांनी केंद्रीय स्तरावरून भरती प्रक्रिया होऊन मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडून निवड यादी पाठविण्यात आल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली व याबाबत वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्याची विनंती मनसे पदाधिकाऱ्यांकडे केली. या संदर्भात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन डाक भरती प्रश्नी राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे जीजी उपरकर यांनी स्पष्ट केले.