आधारकार्ड पॅनकार्ड लिंक न केल्यास दंड आकारणीचा केला निषेध
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आधार कार्ड पॅनकार्ड शी लिंक न केल्यास दंड वसूल करण्याच्या आयकर विभागाच्या धोरणा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिकमांगो आंदोलन छेडण्यात आले.
ज्या नागरिकांनी आधार व पॅन कार्ड माहे सप्टेंबर २०२२ पर्यंत लिंक केले नाही अशांवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने १ हजार रुपये दंड आकारणी सुरू केली आहे आणि ३१ मार्च २०२३ पर्यन्त लिंक न केल्यास इनकम टॅक्स कायदा कलम २७२ बी नुसार १० हजार दंड आकारणी करण्याबाबत सरकारकडून सूचित करण्यात आले आहे. याशिवाय दंड न भरणाऱ्यांचे पॅन कार्ड रद्द करण्याचा इशारा देखील आयकर विभागाकडून देण्यात आला आहे. सरकारचे हे वसुली धोरण जाचक असून सर्व सामान्यांची आर्थिक पिळवणूक करणारे आहे. वास्तविक शासनाकडे नागरिकांचा सर्व डाटा उपलब्ध असताना आवश्यक कार्यवाही करणारे अभिप्रेत असताना शासन स्वतः जबाबदारी झटकून दंड जनतेच्या माथी मारण्याचे कुटील कारस्थान करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
तसेच या दंड वसुलीचा निषेध दर्शवण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीख मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर, प्रसास गावडे, अमोल जंगले, दीपक गावडे, वैभव धुरी, बाबल गावडे, आबा चिपकर, संतोष भैरवकर, निलेश देसाई, इम्रान शेख, नारायण मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी मनसे च्या वतीने जोरदार घोषणा देत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले तर आपल्या मागण्यांचे निवेदन मा. मुख्यमंत्री याना सादर करण्यासाठी प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी वर्षा शिवगण यांच्याकडे मनसे शिस्टमंडळाने सादर केले. यामध्ये त्यानी बेकायदेशीर दंड वसूली तात्काळ थांबवावी,आधार पेनकार्ड लिंक उपक्रम विनामूल्य ग्रामपंचायत स्तरावर राबविन्याचे धोरण निश्चित करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.