कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेला तमाम महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर केला पाहिजे, असा आदेश दिला. त्याच आदेशानुसार कुडाळ येथील सर्व बँकांना मनसेचे पत्र व आरबीआय गाईडलाईन याची प्रत देण्यात आली. यामध्ये बँकांच्या कर्मचारी हिंदी भाषेत बोलतात, मराठीत बोलत नाहीत. बँकांच्या स्लीप, जाहिराती, पत्रके ,पोस्टर्स बोर्ड यावर प्राधान्याने मराठीचा वापर व्हावा, कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी बोलताना सौजन्याने वागावे. हिंदीच बोलले पाहिजे असा आग्रह धरू नये. मराठी भाषेचा अपमान होता नये. या संबंधित ग्राहकांच्या कोणत्याही तक्रारी आमच्याकडे येता कामा नये.अशा सूचना करण्यात आल्या. तरी या संबंधित बँक ग्राहकांच्या काही तक्रारी असल्यास मनसे कार्यकर्त्यांकडे संपर्क करावा असे आवाहन देखील मनसेकडून करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उप तालुकाध्यक्ष गजानन राऊळ, जगन्नाथ गावडे ,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष यतिन माजगावकर उपस्थित होते.





