नवीन संचमान्यतेला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संघटना एकवटल्या!
२८एप्रिलला शाळा बंदचा दिला इशारा,समन्वय समितीचीही स्थापना
तळेरे (प्रतिनिधी) : 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार 2024 – 25 च्या संचमान्यतेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 847 शिक्षक अतिरिक्त होणार असून माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने शाळा वाचविण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था संघटना, मुख्याध्यापक संघ व इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शिक्षक पतपेढीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने सभेमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून संस्थाप्रतिनिधी शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी यांनी 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करावा तसेच अतिरिक्त समायोजन प्रक्रिया राबविण्यात येऊ नये यासाठी आंदोलन करावे लागले तरी चालेल प्रसंगी विद्यार्थ्यांसोबत पालकांना आंदोलनात सहभागी करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 28 तारीखला शाळा बंद आंदोलन करण्याचे ठरविलेले आहे.
त्यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना भेटून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी ,तसेच 15 मार्च 2024 चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. त्यानंतरच त्या ठिकाणी पुढील दिशा ठरवून 28 .04.2025 ला शाळा बंद करण्याचे आंदोलन हाती घेण्यात येणार आहे.या सभेत संस्था संघटना अध्यक्ष गोपाळ सामंत, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आडेलकर,अध्यापक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय शिंदे, मराठा शिक्षक संघाचे अध्यक्ष दिनेश म्हाडगुत,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सचिव अभिजीत जाधव, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे, महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर,संभाजी साटम,गुरुदास कुसगवाकर,तसेच संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक ,शिक्षक व पालक मोठ्या प्रमाणात सभेत उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समिती स्थापना
ओरोस माध्यमिक पतपेढीच्या सभागृहात संपन्न झालेल्या सभेत अतिरिक्त होणारी शिक्षक संख्या ,शासनाचे चुकीचे धोरण आणि त्यामुळे जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळा बंद होणार यासंदर्भात अनेक वक्त्यांनी उहापोह केला.आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली.यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण समन्वय समितीचे स्थापना करण्यात आली, यामध्ये संस्था प्रतिनिधी म्हणून गोपाळ सामंत, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे,शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आडेलकर, अध्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे, मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष दिनेश म्हाडगुत, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सचिव अभिजीत जाधव, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे आदी समन्वय समिती म्हणून यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राशी निगडीत काम करणार आहे. या सभेला जिल्ह्यातील संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.