सिंधुदुर्ग भाजपा १४ मंडळ अध्यक्षांची उद्या हाेणार नियुक्ती जाहीर

ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात सध्या भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व सुरू आहे. या पक्षाने राज्यात दीड कोटीच्या वर सदस्य नोंदणी केली आहे. आता राज्यातील ११४६ मंडल अध्यक्षांच्या निवडी राज्यात एकाच वेळी रविवारी २० एप्रिल रोजी जाहीर होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही १४ मंडळ अध्यक्षांची निवड यादी प्रदेशाकडून उद्या जाहीर होईल. शुक्रवारी मुंबईत झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबतची चर्चा करण्यात आली, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात भाजप मंडळ अध्यक्ष कोण असतील ? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा कोअर कमिटीची बैठक भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मुंबईत संपन्न झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर, प्रमोद जठार, ॲड अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस, महिला अध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष आदी उपस्थित होते. मंडळ अध्यक्ष निवडीबाबत या बैठकीत चर्चा झाली. खा नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवड प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आले.

प्रत्येक जिल्ह्यातील मंडल अध्यक्षांच्या निवडी पारदर्शक व पक्षाचे निरीक्षक नेमणूक करून झाल्या आहेत. पक्षाच्या निरीक्षकांनी त्या त्या मंडळात जाऊन कार्यकर्त्यांची मते आजमावून घेत त्या त्या भागातील कल लक्षात घेऊन निरीक्षकांनी मंडल अध्यक्षांच्या निवडी बाबत प्रदेशला अहवाल सादर केला आहे. या निवडीचा हा बंद लखोटा कोअर कमिटीच्या हाती सोपविला आहे, असेही यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

error: Content is protected !!