न्यायाधीश असल्याची बतावणी करणाऱ्या हिमांशु देवकाते चा जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : तत्कालीन मालवण न्यायाधीशांच्या आडनावातील साधर्म्याचा गैरफायदा घेऊन आपण मालवण न्यायाधीश असल्याची बतावणी सिंधुदुर्ग सायबर सेल पोलिस निरीक्षकांना करून अनोळखी महिलेचे मोबाईल लोकेशन घेऊन तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर अपलोड केल्याबद्दल च्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या हिमांशु उर्फ हिमालय देवकाते याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश देशमुख यांनी फेटाळला. त्यामुळे हिमालय उर्फ हिमांशु देवकाते याचा जेल मुक्काम वाढला आहे. विशेष म्हणजे आरोपी हिमांशु वर दाखल असलेला गुन्हा हा ७ वर्षे खालील शिक्षा पात्र असला तरीही त्याने खुद्द न्यायाधीश असल्याची बतावणी करणे, स्वतः लॉ कॉलेजचा विद्यार्थी असूनही असे गुन्हे करणे ही त्याच्या गुन्हेगारी मानसिकतेची ग्रॅव्हिटी दर्शविते हा सरकारी वकील सरकारी वकील रुपेश देसाई यांनी सरकार पक्षाच्या वतीने केलेला यशस्वी युक्तिवाद जामीन फेटाळताना जिल्हा न्यायालयाने लक्षात घेतला. गव्हरमेंट लॉ कॉलेज मुंबई चा विद्यार्थी असलेल्या हिमांशु याने सिंधुदुर्ग सायबर सेल चे तत्कालीन पोलिस निरीक्षक झावरे यांच्या मोबाईल वर आपल्या मोबाईलवरून कॉल करत आपण मालवण न्यायाधीश बोलत असल्याचे सांगितले. आरोपी हिमांशु याने अनोळखी महिलेच्या मोबाईल लोकेशन मागितले.मालवण न्यायाधीश यांचेही आडनाव देवकाते असल्याने पोलिस निरीक्षक झावरे याने मागितलेली माहिती तत्काळ दिली.आरोपी हिमांशु याने अनोळखी महिलेचे लोकेशन व प्राप्त माहिती त्या महिलेच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पाठवली. याबाबत सदर महिलेने फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर लोकसेवक असल्याचे माहीत असूनही स्वतःबद्दल खोटी माहिती देऊन विश्वासघात केल्याबद्दल ही हिमांशु विरोधात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी हिमांशूचा शोध घेऊनही तो पोलिसांना सापडला नव्हता. दरम्यान आरोपी हिमांशु हा उत्तरप्रदेशमध्ये एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याचे समजताच सिंधुदुर्ग पोलिसांनी कोर्टाकडून परवानगी घेऊन हिमांशु चा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांनी त्याला १६ मार्च २०२५ रोजी अटक केली होती.१७ मार्च रोजी पोलीस कोठडी ची मुदत संपल्यापासून आरोपी हिमांशु हा न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान आरोपीने जामीन मंजूर होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याला सरकारी वकील रुपेश देसाई यांनी जोरदार हरकत घेतली. आरोपीचा जामीन मंजूर होऊ नये यासाठी पुढील कारणे देऊन सरकारी वकील देसाई यांनी युक्तिवाद केला. आरोपी हिमांशु याने गुन्हा करण्यासाठी वापरलेला मोबाईल पोलिस कोठडीदरम्यान पोलीसांना दिला नाही अथवा कोठे आहे हे सांगितले नाही, आरोपीवर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाणे, आझाद मैदान पोलिस ठाणे, मालवण पोलिस ठाणे तसेच उत्तर प्रदेश मध्येही त्याच्यावर गुन्हे दाखल असून जामीन मंजूर झाल्यास तो अशाच प्रकारचे किंवा याहीपेक्षा गंभीर गुन्हे करण्याची शक्यता आहे, आरोपी परजिल्ह्यातील असून जामीनावर मुक्त झाल्यास तो भूमिगत होऊन न्यायालयीन सुनावणीवेळी अनुपस्थित राहू शकतो,गुन्ह्याचा तपासात हस्तक्षेप करू शकतो, साक्षीदारांना प्रलोभने देऊन त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्त करू शकतो,आरोपी हा शासकीय विधी महाविद्यालयात शिक्षण घेत असून त्याला कायद्याचे ज्ञान असूनही त्याने गुन्हे केले आहेत. त्यामुळे आरोपीच्या तसेच त्याच्यासारख्या विचारसरणीच्या लोकांमध्ये कायद्याविषयी भय राहणार नाही. त्यामुळे आरोपी हिमालय उर्फ हिमांशु देवकाते चा जामीन अर्ज नामंजूर करावा हा सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश देशमुख यांनी आरोपी हिमालय देवकाते याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

error: Content is protected !!