सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अल्पवयीन मतिमंद आणि दिव्यांग मुलीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या नराधम पांडुरंग बाळकृष्ण कदम ( वय ३९, रा. नानेली , उत्कर्षनगर , ता .कुडाळ ) याचा जामीन अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती विद्या देशमुख यांनी फेटाळून लावला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी पांडुरंग कदम याने पीडित अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असताना तिच्या घरातील अंगणात तिच्यावर शारीरिक अत्याचार केला होता. ही घटना २६ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली होती. याबद्दल गुन्हा दाखल होऊन आरोपीला २७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीने विशेष जिल्हा न्यायालयात सादर केलेल्या जामीन अर्जाला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. पीडित मुलगी अद्याप झालेल्या अत्याचारामुळे घाबरलेल्या अवस्थेत असून ती अजूनही घराबाहेर पडण्यास घाबरत आहे. आरोपी हा पीडित मुलीवर दबाव आणून कोर्टात साक्ष देण्यापासून परावृत्त करू शकतो, आरोपी फिर्यादी व मुख्य साक्षीदार यांना धमकावून त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्त करू शकतो, आरोपी आडदांड वृत्तीचा असून न घाबरता एखाद्याच्या घरात घुसून अशा प्रकारचे गंभीर कृत्य करणारा आहे,आरोपीविरोधात गावात असंतोष असून त्याला जामीन मिळाल्यास गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, केस च्या सुनावणीवेळी आरोपी कोर्टात हजर राहण्याची शक्यता कमी आहे. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेल्या युक्तिवादानंतर आरोपी पांडुरंग कदम याचा जामीन अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती विद्या देशमुख यांनी फेटाळून लावला.











