एसपी अग्रवाल यांच्या हस्ते १६ एप्रिल रोजी होणार दुचाकी वितरण
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलिस दलातील सर्व पोलिस ठाण्यातील दामिनी पथकासाठी स्पेशल दुचाकी दाखल झाल्या असून जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते जिल्ह्यातील १३ पोलिस ठाण्यांना ह्या दुचाकींचे वितरण बुधवार १६ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. कणकवली पोलिस ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात १६ एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता गाड्यांचे वितरण होणार आहे. महिलांबाबत तक्रारीना तत्पर प्रतिसाद देण्यासाठी दामिनी पथकाची निर्मिती पोलिस दलात करण्यात आली आहे. दामिनी पथकाद्वारे समस्याग्रस्त महिलेच्या ठिकाणी विनाविलंब तत्काळ पोचण्यासाठी या दुचाकीमुळे शक्य होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १३ पोलिस ठाणे आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याला एक दुचाकी देण्यात येणार आहे. याप्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, सावंतवाडी आणि कुडाळ डी वाय एस पी, सर्व पोलिस ठाणे प्रभारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी केले आहे.