ग्रामीण रुग्णालयातील लिपिकाचा राहत्या खोलीत आढळला मृतदेह

वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे कार्यरत असलेले लिपिक सखाराम धर्मा वाझे वय ५२ हे ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीतील त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अन्य कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव गोविंदराव मोरे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे गेली सात-आठ वर्ष सखाराम वाझे हे लिपिक म्हणून कार्यरत होते. ते येथील कर्मचारी वसाहत मध्ये एकटेच राहात होते. त्यांना दारूचे व्यसन होते. दोन दिवस सुट्टी असल्यामुळे ते कार्यालयात आले नव्हते. ते राहात असलेल्या खोलीच्या बाजूचे अन्य कर्मचारी सुट्टीवर गेले होते. सोमवारी सायंकाळी त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे अन्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी खोलीचा दरवाजा उघडून पहिला असता ते खोलीत मृतावस्थेत आढळून आले.याबाबत वैदकीय अधिकरी मोरे यांनी पोलीस ठाणेत खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी भाऊ दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.

error: Content is protected !!