धामापूर ग्रामस्थांनी राबवली प्लास्टिक कचरा व्यवस्थापन मोहीम
चौके (प्रतिनिधी) : धामापूर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने शुक्रवार दिनांक 2 मे रोजी धामापूर गावात गंगा जयंती निमित्त जागतिक वारसा स्थळ असलेल्या धामापूर तलाव परिसरात पावसाळापूर्व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन महिमा अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मालवण बिडीओ श्याम चव्हाण यांनी प्रमुख उपस्थिती लावली. याबरोबरच धामापूर सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, कर्मचारी तेजस्विनी धामापुरकर, उद्योजक महेश परब, ग्रामसेविका पूजा वानोळे, आरोग्य सेविका दिव्या शेवडे, विस्तार अधिकारी सुनील चव्हाण, स्यमंतक संस्थेचे सचिन देसाई, मीनल देसाई, महंमद, मनोज धामापुरकर, अमोल परब, प्रवीण परब आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.
या मोहिमेत प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोल, काच, इलेक्ट्रॉनिक वस्तू, आणि इतर अविघटनशील कचरा गोळा करण्यात आला. तसेच यावेळी ग्रामस्थांना असे आवाहन करण्यात आले की, आपला दैनंदिन कचरा योग्य प्रकारे वेगळा करावा, ओला व सुका कचरा वेगळा ठेवा, पातळ व कठीण प्लास्टिक वेगवेगळे करा, काच व इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा ठेवाआपल्या घरातील कचरा, जाळू नका, टाकू नका, मिसळू नका, तर तो योग्यप्रकारे वर्गीकृत कचरा योग्य विल्हेवाटी साठी गावातील स्वच्छता दुतां कडे जमा करावा. धामापूर ग्रामपंचायत आणि जागरुक ग्रामस्थांच्या या स्वच्छता उपक्रमाचे मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी कौतुक केले.













