वैभववाडी (प्रतिनिधी) : किंजळीचा माळ येथील पुनर्वसन गावठाणाला धरणाच्या पायथ्यापासून अतिरिक्त पाणीपुरवठा योजना करण्याचे लेखी आश्वासन कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पी एन पाटील यांनी हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील धरणग्रस्तांना दिले आहे. त्यानंतर गेले चार दिवस धरणाचे बंद पाडलेले काम सुरू करण्यास धरणग्रस्थानी सहमती दिली. अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील पिण्याचे पाणी व गावठाणातील अपूर्ण नागरी सुविधा याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे संतप्त धरणग्रस्थानी सोमवार दिनांक 19 मे पासून धरणाचे अंतिम टप्प्यात असलेले दरवाज्याचे काम रोखून धरले होते. जोपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ठोस निर्णय होत नाही. तसेच पुनर्वसन गावठाणातील प्रलंबित प्रश्नाबाबत ठोस आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत धरणाचे काम करू देणार नाही. असा आक्रमक पवित्रा घेत गेले चार दिवस धरणाचे काम रोखून धरले होते. दरम्यानच्या काळात उप अभियंता अभय मगरे कार्यकारी अभियंता हर्षल यादव यांनी धरणग्रस्तांची भेट घेऊन काम सुरू करण्यास द्यावे असे विनंती केली होती. मात्र जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन आम्हाला ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत काहीही झाले तरी काम करू देणार नाही, असे ठणकावून सांगितले होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी अधीक्षक अभियंता अभियंता पी एन पाटील कार्यकारी अभियंता हर्षल यादव, उपभियंता अभय मगरे यांनी धरणावर येऊन धरणग्रस्तांची चर्चा केली . यावेळी धरणग्रस्तांनी पुनर्वसन गावठाणातील समस्यांचा अधीक्षक अभियंता यांच्यासमोर पाडाच वाचला. शासनाने सन 2019 साली युद्धपातळीवर आमच्यावर अन्याय करत घळभरणी केली. घाई गडबडीत 2019 साली हेत किंजरीचा माळ येथे आमचे पुनर्वसन केले. पुनर्वसन गावठाणातील सर्व नागरिक सुविधा पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. मात्र पुनर्वसन होऊन पाच-सहा वर्षे झाली तरी पिण्याच्या पाण्यासारखा मूलभूत प्रश्नही ते सोडवू शकले नाहीत. पुनर्वसन गावठाणातील देय असलेल्या नागरी सुविधा अद्याप अपूर्ण आहेत. पुनर्वसन गावठाणात सर्वांना भूखंड मिळालेले नाहीत. पुनर्वसन गावठाणाला महसुली गावाचा दर्जा द्या यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. मात्र प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे. असा आरोप धरणग्रसतांनी केला. यावर उत्तर देतांना अधीक्षक अभियंता पाटील म्हणाले, पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला धरणाच्या पायथ्यापासून पाणी पुरवठा करण्यात येईल. त्याचे अंदाज पत्रक तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधा प्रधान्यक्रम देऊन सोडवण्यात येथील. तसेच तुमचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी खातेनिहाय बैठक घेऊन ते प्रश्न सोडविण्यात येथील, असे आश्वासन दिले. त्यानंतर गेले चार दिवस बंद असलेले धरणाचे काम सुरु करण्यास धरणग्रस्तांनी सहमती दिली.
यावेळी अधीक्षक अभियंता यांनी हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावाठाणाला भेट देऊन गावठाणातील समस्या धरणग्रस्ताकडून जाणून घेऊन त्या सोडविण्याबाबत आश्वासित केले…












