अन्यथा नागरिकांसमवेत उपोषण करण्याचा मंगेश लोके यांचा इशारा
वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीमार्फत सुरू असलेल्या नियोजन शून्य व दर्जाहीन कामाची चौकशी करावी अन्यथा लोकशाही मार्गाने वैभववाडी शहरातील व्यापारी नागरिकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी जिल्हाधिकारी व नगरविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात कोट्यावधीची विकास कामे सुरू आहेत, मात्र ही कामे करताना कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसून येत नाही. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी रस्ते गटार बांधकाम व इतर कामांसाठी कोट्यावधीचा विकास निधी देण्यात आलेला आहे. परंतु नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्यात ताळमेळ नसून त्यांच्या नियोजन शून्य कामामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये खर्चून केलेल्या कामांची पूर्णपणे विल्हेवाट लागली आहे. गेल्या वर्षी दत्त मंदिर ते सावली हॉटेल व तेथून पुढे नारायण वडापाव सेंटर पर्यंत गटार व फुटपाथ बांधकाम मंजूर होते. या दोन्ही कामांसाठी 65 लाखाची निविदा मंजूर करण्यात आली होती. गेल्या वर्षी भर पावसात गटाराचे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. अजूनही या गटाराचे काम अपूर्णच आहे. या गटातून एक थेंबही पाणी निचरा होत नाही. त्याचप्रमाणे वैभववाडी नगरपंचायत दत्त मंदिर ते सांगुळवाडी हॉट मिक्स रस्ता लाखो रुपये खर्च करून करण्यात आला आहे. मात्र पहिल्याच पावसात केल्याने रस्त्यावर खड्डे पडून रस्ता वाहून गेला आहे. त्याचप्रमाणे वैभववाडी बस स्थानक ते संभाजी चौक या ठिकाणी गटार खोदण्यात आले असून लाखो रुपये खर्च करून बांधलेले गटार अपूर्णच आहे. त्यामुळे शहराच्या काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचत आहे. एकूणच वैभववाडी नगरपंचायतीच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिक प्रवाशांना बसत आहे. नगरपंचायतीच्या या अनागोंदी कारभाराची सखोल चौकशी करावी. अशी मागणी मंगेश लोक यांनी केली आहे. अन्यथा नागरिकांसमवेत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.












