वैभववाडी (प्रतिनिधी) : मांगवली सरपंच आणि नळ पाणीपुरवठा कामगार हे सूडबुद्धीने पाणी कपात करून अपुरा पाणीपुरवठा करून आपला मानसिक छळ करीत आहेत. पाण्याचा मूलभूत अधिकार नाकारणाऱ्या व्यवस्थे च्या विरोधात लोकशाही सनदशीर मार्गाने मांगवली ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक २९ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपोषण करणार असल्याचा इशारा मांगवली येथील जेष्ठ नागरिक वासुदेव जुवाटकर यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.
वासुदेव जुवाटकर वय ७०हे मांगवली गावचे रहिवासी असून त्यांच्या घरी नळ पाणी योजनेचा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने या संदर्भात त्यांनी सरपंच शिवाजी नाटेकर यांच्याकडे तोंडी व लेखी तक्रार केली होती. नळ पाणी योजनेच्या पाईप लाईन मध्ये कोणतेही त्रुटी नसताना, कमी दाबाचा पाणीपुरवठा का होतो असा सवाल जुवाटकर करीत आहेत. या यासंदर्भात त्यांनी सरपंच नाटेकर यांना विचारले असता मी जे पाणी देतो ते घ्या त्यासाठी कुठेही जा माझ्याकडे येऊ नका अशी भाषा सरपंचांनी बोलून हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली आहे. पाणी सोडणारा कामगार दिलीप राणे व सरपंच यांच्या संगनमताने पाण्याच्या वेळेत गडबड केली जात आहे.पाणी केवळ १५ ते २० मिनिटेच सोडले जात आहे.त्यामुळे आपल्याला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. असे जुवाटकर यांचे म्हणणे आहे.
अपुरा पाणीपुरवठा संदर्भात वैभववाडी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यांनीही पाण्यासारखा गंभीर विषयी ग्रामपंचायतीने सोडवावा अशा सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी या तक्रारीची शहानिशा करून संबंधित तक्रारदारांना योग्य पाणीपुरवठा करावा. असे संबंधित अधिकाऱ्याने पत्रात नमूद केले आहे. मात्र सरपंच नाटेकर यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. सदरचे सरपंच ठेकेदार असून तालुक्यातील यंत्रणा आपल्या खिशात आहे अशाप्रकारे वागत असल्याचा आरोप जुवाटकर केला आहे. अखंड गावाला वेळेत पाणीपुरवठा केला जातो मग जुवाटकर कुटुंबावरच अन्याय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा केवळ मानसिक छळ नसून जातीयवाद केला जात आहे. यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करावा.अशी मागणी सुद्धा केली आहे.
या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मांगवली ग्रामपंचायतीसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.












