पालकमंत्री नितेश राणेंकडून हायवे उपअभियंता, ठेकेदार यांना सूचना
वैभववाडी (प्रतिनिधी) : आता पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे वैभववाडी शहरातील गटार व रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. अशी सक्त सूचना मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या आहेत. तर पंधरा दिवसात शहरातील गटार व रस्त्याचे काम पूर्ण करू असे ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपभियंता अतुल शिवनिवार यांनी यावेळी सांगितले.
पहिल्याच पावसात वैभववाडी शहरातील गटारांच्या अर्धवट कामामुळे शहरात गटाराच्या पाण्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले होते.याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. याची दाखल घेत पालकमंत्री राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी वैभववाडी शहरातील प्रलबित गटारांची पाहणी केली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, भालचंद्र साठे जयेंद्र रावराणे प्रमोद रावराणे नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे उपनगराध्यक्ष प्रदीप राव राणे प्राची तावडे, रणजीत तावडे संजय सावंत नेहा माईनकर, तसेच प्रांताधिकारी जगदीश काकीतकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, मुख्याधिकारी थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपाभियंता शिवनिवार व ठेकेदार वेल्हाल यांच्याशी चर्चा केली. शहरातील गटार व शहरातील रस्ता पूर्ण करण्याचे आपले नियोजन काय आहे? असा प्रश्न त्यांना केला यावेळी पावसामुळे कामात विलंब झाला आहे. पंधरा दिवसात रस्ता व गटाराचे काम पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.












