उबाठा सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांचा सवाल
वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्याच्या विविध समस्येबाबत काल जो दौरा केला तो दौरा नेमका कोणासाठी होता.? जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी की नगरपंचायतीने केलेल्या निकृष्ट कामाचे अपयश झाकण्यासाठी होता. असा सवाल उबाठा सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केला आहे.
लोके यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रात हा प्रश्न उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणतात,गेले 10 ते 15 दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे वैभववाडी शहरात नगरपंचायतीने केलेल्या गलथान कारभारामुळे वैभववाडी शहर जलमय, चिखलमय झाले होते. याची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री यांनी या दौऱ्यात आपल्या पदाधिकारी यांनी व नगरसेवकांनी बोगस केलेल्या कामांचे अपयश झाकण्यासाठी व त्याचे खापर हायवेच्या ठेकेदाराला व अधिकाऱ्यांवर फोडण्यात आले. परंतु या विधानसभा मतदारसंघाचे आमदार व पालकमंत्री नितेश राणे हे नगरपंचायतीचा गलथान कारभार सुधारण्यासाठी केव्हा लक्ष देणार.. कोट्यावधी रुपये खर्च करून राज्य शासन व जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आणून वैभववाडी नगरपंचायत एक विकासाचे आदर्श मॉडेल बनवणारे पालकमंत्री वैभववाडी दौऱ्यावर आले असताना गेले दहा ते पंधरा दिवस वाभवे नगरपंचायतीच्या गलथान कारभाराच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये व इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे येत असताना सुद्धा व येथील शहरातील व तालुक्यातील नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे.त्याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती न घेता हलक्या कानाने नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व प्रशासनाने ठरवून सांगितल्याप्रमाणे नेहमी प्रमाणे या दौऱ्याचा सोपस्कार पार पाडला.
गेली अनेक वर्षे नगरपंचायतीच्या माध्यमातून विकास कामांच्या नावावर कोट्यावधी निधी खर्च केला जातो परंतु गटारे व संरक्षक भिंत सोडून कुठल्याही मूलभूत सुविधा येथील जनतेला मिळत नाही. कुठलीही खातरजमा न करता विकास कामांसाठी कोट्यावधीची निविदा काढली जात आहे. गेल्या वर्षी बाजारपेठेच्या पूर्व बाजूस दत्त मंदिर ते सावली हॉटेल व सावली हॉटेल ते नारायण वडापाव सेंटर पर्यंत गटार व फुटपाथ या कामासाठी सुमारे 65 लाखाची निविदा काढण्यात आली. लाखो रुपये खर्च करून सुद्धा या गटारात पाणी जात नाही.आणि आता पाऊस पडल्यावर या बाबत वृत्तपत्रात बातम्या आल्यावर गटारात पाणी जावे यासाठी पुन्हा काम करावे लागते यासारखे दुसरे दुर्दैव कुठले..
त्याचप्रमाणे गेल्या भरपावसामध्ये एसटी स्टँड ते संभाजी चौक या गटाराची आता आवश्यकता नसतानाही हे गटार जाणूनबुजून खोदले गेले पाणी जायला मार्ग नसताना सुद्धा या गटाराचे काम संभाजी चौकापर्यंत पूर्ण करण्यास आले. अशी अनेक विकासकामे बेनामी ठेकेदार यांचे आर्थिक बळ वाढविण्यासाठी मंजूर केली जातात या कडे पालकमंत्री महोदय लक्ष देतील काय.? असा प्रश्नही लोके यांनी केला आहे.
वैभववाडी शहरातील व्यापारी व नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामध्ये वैभववाडी शहरामध्ये मोठ्या दिमाखात सुलभ शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु गेले 4 ते 5 महिने सुलभ शौचालय बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील महिला भगिनींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शहरातील काही भागात अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी खड्डे मारून नळाचे पाणी भरावे लागत आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट, सी.सी.टी.व्ही. बंद आहेत. अशा अनेक मूलभूत सोई सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. परंतु जिथे गरज नाही अशा प्रकारची कामे सुचवून कोट्यावधी रुपये निधीचा दुरुपयोग केला जात आहे. कोट्यावधी रुपयेंच्या संरक्षण भिंती आवश्यक नसतानासुद्धा बांधण्यात येत आहेत.
कोट्यावधी रुपयांचा चुराडा करून सुद्धा वैभववाडी शहर हे समस्येच्या गर्तेत सापडलेले आहेत अशी वैभवाडीची दयनीय अवस्था सत्ताधाऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांनी वेळीच लक्ष दिले नाहीतर वरिष्ठ पातळीवर दाद मागणार आहोत असे लोके यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.












