पालकमंत्र्यांकडून भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर जिल्ह्यातील अवैध धंद्यांना पाठीशी घातलत आहेत ; सुशांत नाईक

वैभववाडी (प्रतिनिधी) : अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे व त्यांच्या ग्रामसेवक पत्नी सविता हांडे काळे यांच्या विषयी तक्रार असतानाही त्यांच्यावर कारवाई करायची सोडून त्यांची जिल्हा बदली केली जात आहे.खरंतर स्वतःपालकमंत्र्यांची तक्रार असताना त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणे आवश्यक होते. परंतु त्यांना पाठीशी घालण्याचे काम सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे करीत आहेत.असा आरोप उबाठाचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे.   

वैभववाडी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते यावेळी माजी सभापती लक्ष्मण रावराणे,नगरसेवक मनोज सावंत, दीपक पवार,रोहित पावसकर मोतीराम माने आदी उबाठा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.   

यावेळी बोलताना नाईक पुढे म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर नितेश राणे यांनी अनेक वेळा पत्रकार परिषदा घेऊन जिल्ह्यात अवैध धंदे,गोवा बनावटीची दारू,मटका जुगार अड्डे चालू देणार नाही. असा इशारा दिला होता. मात्र सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, गोवा बनवतीची दारूची विक्री, मटका जुगार हे सर्व धंदे सुरू आहेत. त्यांना पालकमंत्री पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. पालकमंत्री म्हणून प्रत्येक गोष्टीत सेटलमेंट करीत आहेत. आधी ते ठेकेदारांबरोबर सेटलमेंट करीत होते. आता तर त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर सेटलमेंट करायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच हांडे सारख्या भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम ते करीत आहेत. असा आरोप नाईक यांनी केला.   

जिल्ह्यात 432 ग्रामपंचायती असून फक्त 317 ग्रामसेवक कार्यरत आहेत. जिल्ह्यात 115 ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत.असे असतानाही 19 ग्रामसेवकांच्या जिल्हा बदल्या केल्या गेल्या आहेत. याबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी आक्षेप घेतला होता. जिल्हात ग्रामसेवकांची रिक्त पदे असताना या बदल्या कोणत्या पद्धतीने करण्यात असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.तरीही या बदल्या करण्यात आल्या आहेत.     ग्रामसेवक सविता काळे व विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे यांच्या विषयी वर्षभरपूर्वी आमदार असताना नितेश राणे यांनी तक्रार केली होती.स्वतः त्यांच्या तक्रारीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली नाही का? असा प्रश्न करीत आता तर ते पालकमंत्री आहेत आणि त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करायला हवी होती. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची सोडून त्यांची जिल्हा बदली केली जाते. याला पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे.

error: Content is protected !!