भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कोटकामते ग्रामस्थांची मागणी

ग्रामस्थांवर दबाव आणत होत होते कोटकामते ते नारिंगेमध्ये मार्गावर निकृष्ट दर्जाचे काम

देवगड (प्रतिनिधी) : खोट्या तक्रारीदाखल करत कोटकामते ग्रामस्थांवर दबाव आणत चुकीच्या मार्गाने कोटकामते ते नारिंगे भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची तसेच जिल्हात आतापर्यंत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या सर्व कामाचे तृतीयपक्षीय लेखापरीक्षण करण्याची मागणी कोटकामते ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे गेलेली आहे तसेच देवगड पोलीस निरीक्षक यांना या संदर्भात कोटकामते ग्रामपंचायतीने निवेदनही दिले आहे. महावितरण विभागामार्फत प्र.जि.मा. १४ (कोटकामते ते नारीग्रे) रस्त्यावर भूमिगत नवीन विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

सदर काम संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही वैध शासकीय परवानगी न घेता सुरु करण्यात आले आहे. खोदकामासाठी आवश्यक परवाने न घेता हा प्रकार मुजोरीने सुरू करण्यात आल्याने ग्रामपंचायत कोटकामते आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन यास विरोध दर्शविला. त्यांच्या जागरूकतेमुळे सदर बेकायदेशीर काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे.परंतु, परवाने न घेता काम करणाऱ्या ठेकेदाराने, ग्रामस्थांनी कामात अडथळा आणल्याचा खोटा आक्षेप घेऊन देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दिनांक ०३/०६/२०२५ रोजी, पोलिसांकडून ग्रामस्थांना बोलावून हे शासनाचे काम असल्याचे सांगण्यात आले व कामात अडथळा करू नये, असा इशारा देण्यात आला.

तथापि, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणताही अडथळा निर्माण करण्यात आलेला नसून फक्त कामासाठी आवश्यक असलेल्या वैध परवानग्यांची मागणी करण्यात आली होती. संबंधित ठेकेदाराकडे कोणतीही वैध परवानगी उपलब्ध नसल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकरणी बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, उपअभियंता निकाळजे त्यांनी देखील खोदकामासाठी कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले. कामाच्या ठिकाणी रस्त्यांवर खोदकाम करून अनेक ठिकाणी खड्डे बुजवलेले नाहीत. पावसामुळे माती वाहून गेल्याने खड्डे उघडे पडले असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तसेच काही अपघात घडल्याचाही नोंद आहे रस्ता बाजूने खचत चालला आहे. याशिवाय, सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, ठेकेदाराने नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या ठेकेदाराने जिल्ह्यात केलेल्या सर्व कामांचे सर्वेक्षण करून तृतीयपक्षिय लेखापरीक्षण (ऑडिट) करणे आवश्यक आहे. आणि ठेकेदार व्यवस्थापक गठुले यांनी खोटी तक्रार करून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय तसेच शासनाचा वेळ वाया घालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोटकामते ग्रामस्थ करत आहेत.

या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, दिनांक ०५/०६/२०२५ रोजी महावितरण विभागाचे अधिकारी निमकर व देवगड पोलीस निरीक्षक धुमाळ ह्यांनी कोटकामते येथे उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी कोटकामते येथील सामाजिक कार्यकर्ते देवस्थान सचिव सुनील शंकर कामतेकर, जितेंद्र विठ्ठल मेस्त्री ह्यांच्याशीही निमकर ह्यांनी दूरध्वनीवर संवाद साधून साधकबाधक चर्चा केली. सदर ठेकेदाराने दबावतंत्र अवलंबत पोलिसांना ग्रामस्थ शासकीय कामात अडथळा आणत आहे असे भासवत अगोदरच भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवणाऱ्या कोटकामते ग्रामस्थांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांमार्फत उलटतपासणी नंतर ग्रामपंचायत प्रशासनाने पत्रव्यवहार करत ह्या गोष्टीवर अजून प्रकाशझोत टाकला व महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संबंधित ठेकेदाराकडून सर्व आवश्यक वैध परवाने प्राप्त करूनच पुढील कामास अनुमती द्यावी. तसेच ग्रामस्थांविषयी कोणतेही गैरसमज न करता वस्तुस्थिती लक्षात घेऊन कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात येत आहे. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ऋतुजा खाजणवाडकर, उपसरपंच गणेश घाडी, माजी उपसरपंच विजय कुडपकर, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष तुकाराम राऊळ, ग्रामस्थ राकेश खाजणवाडकर आणि इतर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!