कसाल बौद्धवाडीला समस्यांचा विळखा!

समाजमंदिर मोडकळीस : कसाल बौद्ध विकास मंडळाने वेधले ग्रामपंचायीचे लक्ष

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कसाल गावातील बौद्धवाडीला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत असून विकासाच्या वाटेवर येण्यासाठी कसाल बौद्ध विकास मंडळ, मुंबई आणि गाव शाखा यांनी विविध मागण्यांची निवेदने सादर करत ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

कसाल बौद्धवाडी येथे सुमारे ३० कुटुंबे असून १०० ते १३० लोकसंख्या आहे. मागील काही वर्षांपासून बौद्धवाडी येथे विकासकामे तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामपंचायत स्तरावरून कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थ अनेक समस्यांनी ग्रासले आहेत. वाडीत येणारा खड्डेमय रस्ता, जीर्ण अवस्थेतील समाजमंदिर, स्मशानभूमीची कोसळलेली संरक्षक भिंत, गाळ भरलेली विहीर, चुकीच्या जागी ठेवलेली कचराकुंडी, अपूर्ण अवस्थेतील पाट बांधणी आदी समस्यांना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहेत.

सत्ताधाऱ्यांनी कानाडोळा न करता मागील काही वर्षे विकासापासून दूर जात असलेल्या कसाल बौद्धवाडीत विकासनिधी आणून ग्रामस्थांच्या मागण्या सोडविल्या जाणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका महत्वपूर्ण असते, यासाठी कसाल बौद्ध विकास मंडळ, मुंबई यांनी पुढाकार घेत बौद्धवाडीचे जीवनमान उंचावावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

शासकीय विहिरींची दुरुस्ती करून बौद्धवाडीसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी उभारण्यात यावी. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने पावणाई मंदिर ते मालवण जोड रस्ता याठिकाणी पाट बांधणी करावी. वाडीत येणारा रस्ता खड्डेमय बनला असून त्याचे डांबरीकरण होणे आवश्यक आहे. समाजमंदिर आणि स्तंभाकडे हायमास्ट टॉवर उभारणी करण्यात यावी. बौद्धवाडीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कचराकुंडीत बाजारातील कचरा टाकण्यात येतो, त्यामुळे स्वतंत्र आणि कायमस्वरूपी कचराकुंडी उपलब्ध करून द्यावी.

समाजमंदिर मोडकळीस ; स्मशानभूमीची दुरावस्था
समाजमंदिराची फारच दुरावस्था झाली असून पूर्णतः मोडकळीस आले आहे. त्याजागी सुसज्ज असे समाजमंदिर उभारणी करावी. तसेच बोधिसत्व गौतम बुद्धविहार असे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. स्मशानभूमीकडे जाताना मार्ग नसल्याने पावसाळ्यात मृतदेह नेताना अनेक अडचणी येत असून ग्रामस्थांना वाहत्या वाहळातून वाट काढावी लागते. त्यामुळे स्मशानभूमी येथे जाण्यासाठी पूल उभारणी करावी तसेच स्मशानभूमी दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन सरपंच, ग्रामसेवक यांना देत ग्रामपंचायतीला विकासकामांच्या माध्यमातून बौद्धवाडीतील वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेली कामे मार्गी लावावी, अशी आर्त हाक दिली आहे.

error: Content is protected !!