माजी आमदार उपरकर यांचा सवाल
कणकवली (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील मावळ येथील साकव दुर्घटनेनंतर पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग मधील साकवांचा आढावा घेतला. त्यानुसार 813 पैकी केवळ 169 साकव सुस्थितीत असल्याचे पुढे आले. जिल्हाधिकारी असतील किंवा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फक्त दुरुस्ती आवश्यक असलेल्या साकवांची संख्या जाहीर केली. पण लोकांची गैरसोय होणारे हे साकव दुरुस्त कधी होणार? जिल्हा नियोजन च्या माध्यमातून 400 कोटींचा निधी आणणार असल्याची घोषणा करणारे पालकमंत्री आता कुठे आहेत ? पालकमंत्री जिल्ह्यातील जनतेच्या सोयीसाठी आहेत की गैरसोयीसाठी असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.
जिल्ह्यातील जवळपास 406 साकवांची तातडीची दुरुस्ती आवश्यक आहे. त्यासाठी जवळपास 32 कोटी रुपये खर्चाची गरज आहे. तर 313 नवीन साकव बांधण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने ही आकडेवारी जाहीर केली. परंतु त्यासाठीचा उपाययोजना काय याबाबत कोणीच बोलत नाही. अनेक ठिकाणी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा नादुरुस्त सकवावरून जावे लागते. पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांना गुरे घेऊनही अशा अनेक ठिकाणच्या साकवांवरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. जिल्ह्यातील काही स्मशानभूमीकडे जाणाऱ्या साकवांची अशीच अवस्था आहे. येत्या कालावधीत गणेशोत्सवा दरम्यान अनेकांना याच सर्व गणपतीची ने आण करावी लागते. तसेच येत्या निवडणुकीतही याच साकवांवरून कार्यकर्त्यांना लोकांच्या घरापर्यंत जावे लागणार आहे.
त्यामुळे या साकवांच्या दुरुस्तीसाठी 400 कोटींची घोषणा करणारे पालकमंत्री निधी देणार आहेत का? शालेय विद्यार्थी ग्रामस्थ यांना यावर्षीही पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार का ? की कोणती मोठी दुर्घटना घडल्यानंतरच यांना जाग येणार आहे. वास्तविक अशा तातडीच्या दुरुस्तीची गरज असलेल्या साकवांसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या सकवाची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. मात्र तसे काहीच आदेश न देता केवळ आकडेवारी जाहीर करून पालकमंत्री व प्रशासन गप्प बसले आहे. म्हणजेच यांची भूमिका जिल्हावाशीयांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची आहे की गैरसोयी असा सवाल श्री उपरकर यांनी केला आहे.