दोन वॅगणार कार पण नंबर प्लेट एकच

महसूल अधिकारी आणि प्राथमिक शिक्षकाची कमाल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील विद्यानगर भागात एकाच नंबर प्लेट च्या दोन वॅगणार कार असल्याची निनावी तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात येताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पीएसआय अनिल हाडळ यांनी तात्काळ घटनास्थळी जात पाहणी केली आणि दोन वॅगणार कार ला एकच नंबर प्लेट असल्याची खात्री होताच दोन्ही कार पोलीस ठाण्यात आणल्या. ही घटना 19 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पीएसआय हाडळ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कणकवली तहसीलदार कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी पदावर कार्यरत असलेले सत्यवान भगवान माळवे यांच्या वॅगणार कार क्रमांक MH 07 – AG 8533 ही असून माळवे हे डीचोलकर कॉम्प्लेक्स विद्यानगर येथे राहतात. याच बिल्डिंग मध्ये नाधवडे येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक विनोद विठ्ठल खंडागळे यांच्याकडे असलेल्या वॅगणार कारलाही MH 07 AG 8533 याच नंबरची प्लेट असलेली दिसून आली. दोन गाड्यांचे एकच नंबर दिसून येताच पोलिसांनी दोन्ही कार पोलीस ठाण्यात आणल्या. दरम्यान याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे कळविण्यात आले असून त्यांच्याकडून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पीएसआय हाडळ यांनी सांगितले. दरम्यान सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ओरोस येथील मोटरवाहन निरीक्षक अतुल चव्हाण कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले असून पुढील दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई सुरू होती.

error: Content is protected !!