वैभववाडी (प्रतिनिधी) : पनवेल ते कणकवली दरम्यान जनशताब्दी एक्सप्रेसने प्रवास करणारे विठ्ठल रावजी जंगले वय ६६ रा.सावरवाड ता. मालवण या प्रवाशाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. विठ्ठल जंगले हे मुलगा राकेश व बिपिन तसेच पत्नी रूपाली यांच्या समवेत शुक्रवारी सकाळी जनशताब्दी एक्सप्रेसने पनवेल येथे सकाळी 6.45 वाजता गाडीत बसले. हे सर्व कणकवली येथे निघाले होते. दरम्यान जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी स्टेशन वरून सुटल्यानंतर विठ्ठल जंगले यांना अस्वस्थ वाटू लागले याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी तिकीट तपासणी यांना कल्पना दिली. तिकीट तपासणीस यांनी याची दखल घेऊन जनशताब्दी एक्सप्रेस तात्काळ वैभववाडी रेल्वे स्टेशनला थांबवली. त्या ठिकाणी त्यांना उतरून घेऊन 108 ॲम्बुलन्स ने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता उपचारपूर्वीच ते मृत झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती जंगले यांचा मुलगा विठ्ठल याने वैभववाडी पोलीस ठाणेत दिली आहे. वैभववाडी पोलिसांनी सदर घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये प्रवाशाचा आकस्मिक मृत्यू
