वादळी वाऱ्यात एडगाव येथे घरावर चिंचेचे झाड पडून लाखोचे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने एडगाव येथे घरावर भले मोठे चिंचेचे झाड पडून घराचे लाखोचे नुकसान झाले आहे.सुदैवाने घरात झोपलेल्या माय लेकी या अपघातातून बालबाल बचावल्या आहेत. तर लोरे नं २ येथे एक घर व गडमठ येथे सुद्धा एका घराचे नुकसान झाले आहे.

वैभववाडी तालुक्यात काही दिवसाच्या विश्रांतीनंतर गेले दोन दिवस वैभववाडी तालुक्यात मुसळधार पावसाने सुरवात केली आहे. मंगळवारी रात्री १. ३० वाजण्याच्या सुमारास एडगांव पाष्टेवाडी येथील श्रीमती प्रमिला भिकाजी पाष्टे यांच्या घरा शेजारी असलेले चिंचेचे भलेमोठे झाड मोडून पडल्यामुळे त्यांचे घर जमीदोस्त झाले आहे. यावेळी घरात प्रमिला पाष्टे व त्यांची मुलगी अश्विनी झोपल्या होत्या. सुदैवाने या अपघातात त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. घरावर झाड पडलेल्या समजल्यानंतर एडगाव येथील  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद  रावराणे, विलास देसाई व ग्रामस्थांनी जाऊन त्यांना धीर दिला. 

प्रमिला पाष्टे यांनी काही वर्षांपूर्वीच घरकुल योजनेतून हे घरकुल बांधले होते. ऐन पावसाच्या दिवसात घरावर झाड पडून घर जमीनदोस्त झाल्यामुळे या मायलेकीचा डोक्यावरचा निवारा गेला आहे.त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे लोरे 2 येथील परशुराम महादेव गोसावी यांच्या घरावरील पत्रे वाऱ्याने उडाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर गडमठ येथील सरिता वाडेकर यांच्या घरावरील कौले व वासे मोडून त्यांच्याही घराचे मोठे नुकसान झाले आहे. तरी सर्व नुकसानग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

error: Content is protected !!