आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिंबक देऊळवाडी येथील रहिवासी विष्णू लक्ष्मण तावडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. मालवण तालुक्यात ‘मामा’ या प्रेमळ टोपणनावाने सुपरिचित होते.
विष्णू तावडे यांची ऐन उमेदीत नजर गेली होती. मात्र त्या दिव्यांगावर मात करून त्यांनी मालवण पंचायत समितीमधील तालुकास्कूल येथे परिचर या पदावर इमान इतबारे नोकरी केली. अंध असूनही ते त्यांच्यावर सोपविलेली सर्व कामे अचूक करीत असत. त्यांच्या कामाची दखल घेऊन मालवण पंचायत समितीच्या आदर्श कर्मचारी पुरस्काराने विष्णू तावडे यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय मालवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांकडूनही त्यांचा वेळोवेळी सन्मान करण्यात आला होता. चार वर्षांपुर्वीच ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होऊन त्रिंबक येथील घरी स्थायिक झाले होते.
त्रिंबक पंचक्रोशीतील ते एक नावाजलेले भजनीबुवा होते. दिव्यांगावर मात करीत विविध सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत होते. कोकणातील प्रथितयश साहित्यिक व शिक्षक असलेल्या बाबू घाडीगांवकर यांचे ते मामा होते. सर्वांशी नित्य प्रेमाने वागणाऱ्या नेहमी हसतमुख असलेल्या विष्णू तावडे यांचा मित्र परिवार व लोकसंग्रह मोठा होता. मात्र अल्पशा आजाराने त्यांचे मुंबईतील सायन हाॅस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी असा परिवार आहे. विष्णू तावडे यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.












