बांधावरची शाळा आणि वर्षा सहलीचा विद्यार्थ्यांनी लुटला आनंद
आचरा (प्रतिनिधी) : शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो. याच गोष्टीचा विचार करून आपल्या महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक दृष्ट्या शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या जीवन, शेतीची अवजारे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी ‘बांधावरची शाळा’ हा अभिनव उपक्रम राबवला आहे.
जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडीचा एक आगळा-वेगळा “बांधावरची शाळा” हा निसर्गाशी नातं जोडणारा उपक्रम पार पडला. या उपक्रमाची सुरुवात दिगंबर महादेव जाधव यांच्या शेतात झाली. मुलांनी शेती विषयक कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला यामध्ये लावणी करणे, तरवा काढणे, तरवा लावणे तसेच पारंपारीक शेतीतील अवजारे, आधुनिक शेतीची नविन पध्दत, अवजारे या बाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला, स्थानिक पद्धतीची माहिती जाणून घेतली.
“निसर्गाशी नातं जपा अनुभवातून शिकवा” या ब्रिद वाक्याला अनुसरून विद्यार्थ्यांनी वर्षा सहलीचाही मनमुराद आनंद लुटला. चिंदर भटवाडी येथील पुरातन पवित्र अशा “पोसे पाणी” याठिकाणी धबधब्यावर पोहणे, खेळणे, बागडणे, रान भाज्याची माहिती यात दिवसभर विद्यार्थी रममाण झाले. मोबाईल, टिव्ही या आभासी दुनियेत अडकलेल्या मुलांना निसर्गाच्या सानिध्यात खेळण्याची, शिकण्याची आणि अनुभव घेण्याची संधी यामार्फत विद्यार्थी आणि शिक्षक यांना मिळाली. हा उपक्रम निसर्गाशी नातं जपणं, शेतीची महत्त्व समजावणं आणि आरोग्यदायी अनुभव देणं यासाठी राबविण्यात आला.
यावेळी या उपक्रमात मुख्याध्यापक निशिगंधा वझे, शाळा कमिटी अध्यक्ष महेंद्र कदम, अनिता जाधव, पूर्वा चव्हाण, समृध्दी दळवी, सानिका पवार, निलेश परब, शिक्षक मैना कारंडे, बहुसंख्य विद्यार्थी, पालक आदी सहभागी झाले होते.












