सायबर गुन्ह्यांविषयी सजगतेचा संदेश – कणकवली पोलिसांचा घोणसरी नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांपासून सजग राहणं अत्यावश्यक आहे, हे अधोरेखित करत शाळा घोणसरी क्र. १ आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन सुतार यांच्यावतीने सायबर सुरक्षेवर आधारित विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.

कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रवी पन्हाळे, महिला पोलिस विनया सावंत व निवृत्त पोलिस उपनिरीक्षक विनायक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत सायबर गुन्हेगारीच्या प्रकारांची ओळख करून दिली.

सायबर गुन्हेगारी ही इंटरनेट, मोबाईल आणि संगणक वापरून केली जाणारी फसवणूक आहे. सोशल मीडियावर बनावट ओळख तयार करून छेडछाड, आर्थिक फसवणूक, पासवर्ड चोरी, फसव्या लिंकद्वारे बँक खात्यांवर हल्ले अशा प्रकारांचा यात समावेश होतो, असे रवी पन्हाळे यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना मोबाईल वापरताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, सुरक्षिततेसाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात आणि सायबर फसवणूक झाल्यास त्वरित काय करावे, याचे प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून संवाद अधिक अर्थपूर्ण केला.

या उपक्रमात मुख्याध्यापिका बेळणेकर मॅडम, घोणसरी पोलीस पाटील , तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते….

शाळेच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले असून विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेची भक्कम जाणीव करून देणारा हा कार्यक्रम ठरला.

error: Content is protected !!