खारेपाटण (प्रतिनिधी) : गुरुवर्य कै. वामनराव काराणे यांच्या प्रेरणेतून साकारलेले आदर्श संगीत विद्यालय कणकवली यांच्या वतीने गुरुपौर्णिमे निमित्त गुरुवंदना – २०२५ कार्यक्रमाचे आयोजन कणकवली येथे करण्यात आले असून दी.१९ व २० जुलै २०२५ असा सलग दोन दिवस हा कार्यक्रम चालणार असल्याची माहिती संगीत विद्यालयाचे प्रशिक्षक संदीप पेंडूरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. पी. जी. कांबळे, आण्णा कोदे, डॉ. मीनल नागवेकर, डॉ. विनय शिरोडकर, राजेंद्र कृपाळ, डॉ. विवेक रेवडेकर, डॉ. मुक्तानंद गवंडळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाचे प्रथम सत्र दी. १९ जुलै २०२५ रोजी दु.३.०० वा. सुरू होणार असून पखवाज विशारद संदीप मेस्त्री यांचे पखवाज वादनाचे विशेष सादरीकरण होणार आहे. तसेच द्वितीय सत्र दी. २० जुलै २०२५ रोजी स. १०.०० वा. आणि तृतीय सत्र दु.३.०० वा. सुरू होणार आहे. या कार्यक्रमात संगीत गुरू माजी शिक्षक बाळ नाडकर्णी, ज्येष्ठ लोककलावंत सामाजिक कार्यकर्ते प्रा. हरिभाऊ भिसे, पखवाज विशारद संदीप मेस्त्री, गायन विशारद श्रुती परुळेकर व कथक विशारद गौरी कामात यांचा विशेष सत्कार आदर्श संगीत विद्यालय कणकवलीच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आदर्श संगीत विद्यालय कणकवलीच्या वतीने सर्वांना करण्यात आले आहे.













