कणकवली (प्रतिनिधी) : हळवल-शिवडाव मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांनी पोखरलेला असून या मार्गाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. साधारण एक किलोमीटर अंतर असलेला हा रस्ता खड्यांमुळे प्रवासयोग्य राहिलेला नाही. हळवल भाकरवाडी ते राजवाडी शिवडाव हा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून डांबरीकरणासाठी प्रलंबित आहे. स्थानिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, मागणी केली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. गणेशोत्सवाच्या काळातही गणेशमूर्ती याच मार्गावरून वाहून नेल्या जातात, त्यामुळे यंदा तरी रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
या रस्त्यावरून दररोज शिवडाव हायस्कूलचे ४० ते ४५ विद्यार्थी एसटी बसने प्रवास करतात, मात्र खड्यांमधून बस चालविणे हे बसचालकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट नसल्याने हा धोका अधिकच वाढतो. या भागात जंगली जनावरांचेही प्रमाण अधिक असल्याने प्रवास आणखी धोकादायक ठरतो आहे. संबंधित विभाग व स्थानिक प्रशासनाने तातडीने या मार्गाचे डांबरीकरण व प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि वाहनचालक यांच्यामधून केली जात आहे.














