कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमालकाच्या मुलाचा शर्ट फाडण्याचा प्रकार एका राजकीय कार्यकर्त्याला चांगलाच भोवला असून शर्ट फाटलेल्या युवकाच्या मित्रांनी त्या कार्यकर्त्याला सारी बंधने “पार” करत एका बार मध्ये बेदम चोपले. राजकीय कार्यकर्त्यासोबत राज्यातील विरोधी पक्ष सदस्य असला तरी तेवढासा सक्रिय नसलेल्या ” भंपक ” कार्यकर्त्यालाही चांगलाच चोप “खिल” वला. ही घटना 28 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा हायवेलगत शहरातील गोकुळ नावाने प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी घडली. हॉटेलमालकाचा तब्बेतीने तगडा असलेला मुलगा वडिलांच्या हॉटेलकडे बसलेला असताना राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या ” त्या” राजकीय कार्यकर्त्याने एका विषयावरून त्याच्याशी वाद घातला. तसेच त्याचे शर्ट फाडले. या घटनेनंतर तो राजकीय कार्यकर्ता आणि त्याच्यासोबत असलेला मित्र हॉटेल लगतच्या बारमध्ये बसले होते. शर्ट फाटल्यानंतर युवकाने आपल्या मित्रपरिवाराला घटनास्थळी बोलावून घेतले. शर्ट फाडून बारमध्ये बसलेल्या त्या कार्यकर्त्याला बारमधून बाहेर येण्याचे आव्हान देण्यात आले. मात्र बराच वेळ तो कार्यकर्ता बाहेर येत नव्हता. अखेर शर्ट फाटलेल्या युवकाने व त्याच्या मित्रांनी बारमध्येच त्या कार्यकर्त्यांसह त्याच्यासोबत बसलेल्या भंपक कार्यकर्त्यावर दे दणादण हातसफाई केली. अगदी खाली लादिवर पाडून पाठीवर पाय ठेवून चोपल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी तडजोडीने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला असला तरी शहरात मात्र या दे दणादण प्रकरणाची चांगलीच चर्चा आहे.
शर्ट फाडण्याचा प्रकार भोवला ; दोघांना बेदम चोपले












