कलाकार मानधन मंजुरीसाठी शासकीय कर्मचाऱ्याकडून आर्थिक मागणी

राजर्षी शाहू कलाकार मानधन समितीचे माजी अध्यक्ष संतोष कानडे यांनी केली भांडाफोड

कोणीही आर्थिक मागणी केल्यास किंवा पैसे दिले असल्यास संपर्क साधण्याचे कानडे यांचे आवाहन

काहिजणांकडून उकळलेले पैसे द्यायला लावले परत

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या किंवा विचाराधीन असलेल्या काही प्रस्ताव मंजुरीसाठी समाजकल्याण विभागातील एका कर्मचाऱ्याने 20 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समितीच्या माध्यमातून मागील दोन वर्षांत 300 कलाकारांना दरमहा मानधन मिळवून देण्यात आले आहे. मात्र हा प्रस्ताव मंजुरी साठी समाजकल्याण विभागातील एका कर्मचाऱ्याने आर्थिक मागणी केल्याचा भांडाफोड खुद्द या समितीचे माजी अध्यक्ष संतोष कानडे यांनी केला आहे. त्या कर्मचाऱ्याला कणकवली शहरात एका ठिकाणी चांगलेच धारेवर धरून त्याने केलेल्या रचलेल्या “कुं” भांडं फोडून आपल्या स्वार्थासाठी आर्थिक “भार” प्रस्ताव करणाऱ्या कलाकारांवर टाकणाऱ्या समाजकल्याण विभागातील त्या कर्मचाऱ्याला चांगलीच अद्दल घडविली आहे. एवढेच नाही तर संतोष कानडे यांनी त्या कर्मचाऱ्याने काही जणांकडून घेतलेले हजारो रुपये लागलीच त्याला परत द्यायलाही लावले. त्या कर्मचाऱ्याने केलेल्या या घटनेचा निषेध करताना संतोष कानडे यांनी जर त्या कर्मचाऱ्याने आणखी कोणाकडून अशी आर्थिक मागणी केली असेल किंवा कोणाकडून पैसे घेतले असतील तर आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संतोष कानडे यांनी आपल्या अध्यक्षतेखाली एकूण 300 वृद्ध कलाकारांना शासनाच्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. लाभार्थ्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी तत्कालीन आमदार विद्यमान पालकमंत्री नितेश राणे आणि माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी दिलेल्या अध्यक्षपदाच्या संधीतून प्रयत्न केले आहेत. मात्र आम्ही मंजूर केलेल्या प्रस्तावांचा गैरफायदा घेऊन आर्थिक लाभ उठवण्याची शासकीय कर्मचाऱ्याची वृत्ती चुकीची आहे. त्यामुळे अशी घटना कोणाबाबत घडली असल्यास संपर्क साधावा. दरम्यान या घटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली असून वृद्ध कलाकारांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यावर आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार असा सवाल वृद्ध कलाकारांकडून होत आहे. या योजनेनंतर्गत 50 वर्षावरील वृद्ध कलाकारांना दरमहा 5 हजार एवढे मानधन मिळते. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत हे प्रस्ताव मंजूर केले जातात. उतार वयात दरमहा मिळणारे 5 हजार हा खरेतर मोठा आधार असतो. समाजकल्याण विभागात कार्यरत असणाऱ्या त्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांना 10 हजार रुपये द्यावे लागतील आणि अध्यक्षांना 10 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून काही जणांकडून 20 हजार रुपये उकळल्याचे माजी अध्यक्ष कानडे यांनी केलेल्या पोलखोल मध्ये उघड झाले आहे. समाजकल्याण विभागात कार्यरत असणाऱ्या त्या कर्मचाऱ्याने समाजाऐवजी स्वतःचेच कल्याण करून घेण्याचा प्रकार उघड झाला असून यामुळे खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!