१ ऑगस्टला महसूल दिन, ७ दिवस विविध उपक्रम
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महसूल विभागाचे काम जनतेसमोर आणण्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत राज्यभर महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
या सप्ताहात महसूल विभागाच्या विविध सेवा आणि योजनांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाईल. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी या सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. यानिमित्त १ ऑगस्टला महसूल दिन साजरा करण्यात येईल. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाईल तसेच लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप होईल, २ ऑगस्टला २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या पात्र कुटुंबांना जागेचे पट्टे वाटप केले जातील, ३ ऑगस्टला पाणंद आणि शिवरस्त्यांची मोजणी करून दुतर्फा झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, ४ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळात राबवण्यात येईल, ५ ऑगस्टला विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे अनुदान मिळालेले नाही, त्यांना घरभेट देऊन अनुदानाचे वाटप केले जाईल, ६ ऑगस्टला शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे काढणे, तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेतले जातील, ७ ऑगस्टला एम-सँड धोरणाची अंमलबजावणी करणे आणि नवीन कार्यप्रणालीनुसार धोरण पूर्णत्वास नेण्याचे नियोजन होईल. याच दिवशी महसूल सप्ताहाचा समारोप होईल.
या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन महसूल सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.












