खारेपाटण जुनिअर कॉलेज मधील +2 स्तर व्यवसाय अभ्यासक्रमाचे ज्येष्ठ शिक्षक महेंद्र चिंगळे यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा कार्यक्रम संपन्न

शाळेला १ लाख २५ हजार रुपयांची देणगी केली जाहीर

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे 2+ स्तरित व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इलेक्ट्रॉनिक विभागात कार्यरत असणारे महेंद्र चिंगळे हे नियत वयोमनानुसार दि. ३१ जुलै, २०२५ रोजी सेवेतून सेवानिवृत्त झाले असून नुकताच त्यांचा खारेपाटण शिक्षण संस्था व हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कर्मचारी वर्गाच्या वतीने सेवानिवृत्ती सदिच्छा कार्यक्रम खारेपाटण हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला.

महेंद्र चिंगळे यांनी खारेपाटण कॉलेजमध्ये ३४ वर्षे सेवा बजावली. तर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या विभागाच्या माध्यमातून पंचक्रोशीतील असंख्य विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम शिकण्याची संधी त्यांनी प्राप्त करून दिली. श्री. चिंगळे यांच्या सेवानिवृत्ती पर समारंभासाठी त्यांची मुलगी वैष्णवी व मुलगा शिवम, तसेच त्यांचे मोठे बंधू, इतर नातेवाईक उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी चिंगळे यांच्या ३४ वर्षांच्या कारकीर्दीचा, तसेच त्यांच्या मनमिळावू आणि मिश्किल स्वभावाचा आपल्या मनोगतात उल्लेख केला.

यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व संचालक, तसेच सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , हितचिंतक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री. चिंगळे यांच्या कार्याचा आढावा घेतला व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्री. चिंगळे यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयीची कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

आपण खारेपाटण येथे सेवानिवृत्ती नंतरही येत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली व प्रशालेला सुमारे १ लाख २५ हजार रुपयाची देणगी याप्रसंगी त्यांनी जाहीर केली. उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वर्ग यांनी श्री. चिंगळे यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कोकाटे व सर्वांचे आभार श्री. कानागल यांनी मानले.

error: Content is protected !!