निसर्ग मंगळागौर… या अभिनव कार्यक्रमाचे युथ हॉस्टेल बोरिवली युनिटकडून आयोजन
युथ हॉस्टेल्स बोरिवली युनिटचा आगळावेगळा उपक्रम
खारेपाटण (प्रतिनिधी) : युथ हॉस्टेल बोरीवली युनिट कडून नुकतेच निसर्ग मंगळागौर या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन तारा येथील युसूफ मेहेरअली सेन्टर, मुंबई येथे करण्यात आले होते. निसर्गाच्या सानिध्यात पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात उत्तर, मध्य, पूर्व आणि पश्चिम मुंबईतील ५५ महिलांनी सहभाग घेतला.
गेल्या एक वर्षात नव्याने स्थापन झालेल्या युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया – बोरिवली युनिटने समाजाभिमुख आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ट्रेकिंग हे जरी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असले, तरी समाजोपयोगी विविध उपक्रमही संस्थेने यशस्वीपणे पार पाडले आहेत. या उपक्रमांतर्गत जुन्या कपड्यांचे संकलन करून अनाथाश्रमांना देणे, वृद्धाश्रम आणि आधाराश्रमांना भेट देऊन आवश्यक वस्तू पुरवणे तसेच त्यांच्या सहवासात एक दिवस आनंदाने घालवणे यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला संचालिका स्नेहल भूषण म्हात्रे, सेक्रेटरी दिनेश वैद्य, वाइस् प्रेसिडेंट स्नेहल नारकर आणि लीडर स्वाती शिरोडकर यांची उपस्थिती लाभली होती. ‘निसर्ग म्हणजेच आपला श्वास… आणि या श्वासाचे रक्षण करणे, वृक्षतोड टाळून वृक्षारोपणास प्रोत्साहन देणे यासाठी जनजागृती’ हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री मनोज मोरे, मनोज शिरोडकर,राजेश गांधी, सुदेश नारकर आणि संजय शेलार या युवा स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले. या निमित्ताने निसर्गाविषयीचा आदर, संवेदनशीलता आणि बांधिलकी समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वीपणे साध्य झाला आहे.












