आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचा 14 एप्रिल रोजी द्वितीय वर्धापन दिन

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : अल्पावधीत वाचक आणि दर्शकांच्या हृदयात आपले एक अढळ स्थान निर्माण केलेल्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा उद्या शुक्रवार दिनांक 14 एप्रिल, 2023 रोजी दुपारी 3.30 वाजता कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे संपन्न होत आहे. अनेक दुर्लक्षित आणि उपेक्षित समाज घटकांना मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 14 एप्रिल, 2021 रोजी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. अनेक उपेक्षितांच्या तसेच समाजातील प्रश्नांना वाचा फोडत आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल आपली वाटचाल वाचकांच्या आणि दर्शकांच्या विश्वासार्हतेमुळे यशस्वीपणे करत आहे. सत्य, विश्वासार्ह बातमी आणि नाविन्यपूर्ण संकल्पना या मूलत्त्वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिजिटल न्यूज मीडियात नवी क्रांती घडविणारे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल अल्पावधीतच केवळ जिल्हा वासियांच्याच नव्हे तर समाजप्रबोधन आणि सर्जनशीलतेचा वसा घेऊन वाटचाल करणाऱ्या प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनले आहे.

14 एप्रिल रोजी संपन्न होत असलेल्या द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात मान्यवरांचादेखील सन्मान करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्याला देवगड-कणकवली-वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे, मालवण-कुडाळ मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, पद्मश्री परशुराम गंगावणे, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, समाजभूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ता रुपेश सावंत, कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड, डीवायएसपी विनोद कांबळे, कणकवली तहसीलदार रमेश पवार, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, रेडिओलॉजिस्ट कवी डॉ. सतीश पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचे संपादक राजन चव्हाण आणि आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल परिवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!