अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ संग्रहवरील समिक्षा ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात इतिहासकार जयसिंगराव पवार यांचे प्रतिपादन
प्रा.एकनाथ पाटील संपादित ‘युगानुयुगे तूच: संदर्भ आणि अन्वयार्थ’ समिक्षा ग्रंथाचे प्रकाशन
कणकवली (प्रतिनिधी): सर्व महापुरुषांच्या अनुयायांनीच महापुरुषांना आज जातीधर्मात बंदिस्त केले आहे. या चौकटीतून त्यांना बाहेर काढले पाहिजे. महापुरुष सर्वांचेच असतात. ते कोणा एका जातीधर्माचे नसतात हे आता पुढे येऊन सांगितले पाहिजे. बहुजनांचे महामानव आज हायजॅक केले जात आहेत. महापुरुषांच्या पळवापळवीचे सांस्कृतिक राजकारण आपण नीट समजून घेतले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार यांनी कवी अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ दीर्घ कविता संग्रहावरील प्रा. एकनाथ पाटील संपादित ‘युगानुयुगे तूच: संदर्भ आणि अन्वयार्थ’ या समिक्षा ग्रंथ प्रकाशना वेळी केले. कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे ज्येष्ठ विचारवंत प्रा.अशोक चौसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मुंबई लोकवाड:मय गृहने प्रकाशित केलेल्या ‘युगानुयुगे तूच: संदर्भ आणि अन्वयार्थ’ या समिक्षा ग्रंथाचे प्रकाशन श्री पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी बोलताना श्री पवार यांनी महापुरुषांच्या पळवापळवीचे सांस्कृतिक राजकारण करणाऱ्यांना फक्त स्वत:च्या सत्तेचेच राजकारण करायचे आहे.२०१४ नंतर ही परिस्थिती अधिकाधी बिघडत निघाली आहे. बहुजनांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आंबेडकर समजून घ्यायचे असतील, तर आधी महात्मा फुले समजून घेतले पाहिजेत’ असेही आग्रहाने सांगितले.यावेळी कवी अजय कांडर, प्रा.एकनाथ पाटील उपस्थित होते. प्रा.चौसाळकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे वैश्विक विचार आहेत. त्यांनी कधीच एका जातीसाठी आपले विचार मांडले नाहीत. शोषित समाजाच्या सुखदुःखाचा विचार करताना त्यानी विश्वकल्याणाचाही विचार केला. त्यामुळे त्यांना एका जातीत बांधता येत नाही. ते साऱ्या समाजाचे आहेत. हीच मांडणी कवी अजय कांडर आपल्या ‘युगानुयुगे तूच’ या दीर्घ कवितेत करतात.या संग्रहाच्या एका वर्षात तीन आवृत्या निघाल्या आणि या संग्रहावर विपुल लिहिले गेले. अलिकडल्या काळात कवितेला असा प्रतिसाद मिळणे ही दुर्मिळ घटना आहे.याच लेखनाचा हा ‘युगानुयुगे तूच: संदर्भ आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ आहे. अजय कांडर म्हणाले, बाबासाहेबांच्या राजकीय विरोधकांवर टीका करण्यापेक्षा त्यांच्या सांस्कृतिक विचाराला विरोध करणाऱ्यांचा समाचार आपण घेण्याची गरज आहे. पण आपण तसं न करता जात आणि धर्म बळकट करणाऱ्या विरोधकांनाच आजवर शरण गेलो. आता तर ही परिस्थिती अधिकच कठीण होत गेली आहे. आणि असेच लोक महापुरुषांना पळवा पळवी करण्याचे राजकारण करत आहेत.बाबासाहेबांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली, भारतीय स्त्रीला अधिकार देऊन तिला आत्मसन्मान प्राप्त करून दिला. पण हे त्यांचे ऋण भारतीय स्त्रीचं विसरली आहे.याचे कारण बाबासाहेब फक्त दलितांचे कैवारी असा समज सर्वत्र पसरवीला गेला. पण यापुढे बाबासाहेबांसारखा महामानव समग्र समाजाने समजून घेतला नाही तर बहुजनांचे जगणे मुश्किल होत जाईल.
यावेळी प्रा.एकनाथ पाटील यांनी विचार व्यक्त केले.