फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडा बाजारपेठेतील ज्येष्ठ भुसारी आणि वनौषधी व्यापारी, शशिकांत महादेव तथा नाना डोर्ले (८६ वर्षे) यांचे वृद्धापकाळतील आजाराने, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांचा मितभाषी – मिस्कील स्वभाव आणि चेहऱ्यावर स्मितहास्य, अजातशत्रू व ग्राहकाशी सलोख्यामुळे आणि योग्य आरोग्य मार्गदर्शनामुळे त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. व्रतस्थ, अफाट वाचनामुळे सर्वंकष चर्चेमध्ये ते अभ्यासू होते.
त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. फोंडाघाटमधील सुजाता मेडिकलचे मालक व आझाद ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष अभिनंदन, तसेच शिरगाव मधील मेडिकलचे संजय यांचे ते पिताश्री होत. त्यांच्या निधनानंतर संध्याकाळी अंतयात्रेमध्ये सर्व स्तरातील नानाप्रेमी वैकुंठ भूमीपर्यंत उपस्थित होते. तेथे त्यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.










