खारेपाटण बॉक्सवेल झाला खाजगी वाहने उभी करण्याचा वाहनतळ

आर टी ओ, पोलिस व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अपघात होण्याची दाट शक्यता

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण येथे महामार्गावरून थेट खारेपाटण बाजारपेठ व शहरात जाण्यासाठी बनविण्यात आलेला बॉक्सवेल सध्या खाजगी वाहने विश्रांतीकरिता कायमस्वरूपी उभी करून ठेवण्याचा जणू वाहनतळच झाला असून यामुळे या बॉक्सवेल मधून एस. टी. बस तसेच इतर वाहने जाताना त्यांना अडथळा निर्माण होत असून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी बॉक्सवेल मधील खाजगी वाहने त्वरित हटविण्यात येऊन बॉक्सबेल वाहतुकीला मोकळा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व झुंझार मित्र मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये यांनी सबंधित अधिकाऱ्याकडे केली आहे.

सध्या गौरी गणपतीचा सण असल्यामुळे मुंबईकर गणेशभक्त चाकरमानी आपल्या गावी आपल्या वैयक्तिक वाहनाने तर काही एस. टी. बस व रेल्वेने गावी आले असून खारेपाटण बाजारपेठेमध्ये खरेदी करता दशक्रोशीतील नागरिक आपली वाहने घेऊन येत असतात. परंतु खारेपाटण येथील बॉक्सवेल हा सध्या वाहतुकीच्या दुष्टीने निष्क्रीय बनला असून बॉक्सवेल मधून वाहने नेताना चालकाना कसरत करत वाहने चालवावी लागत आहे. कारण बॉक्सवेल हा सध्या खाजगी वाहनांचा वाहने उभी करून ठेवण्याचा वाहनतळ झाला असून याकडे पोलिस प्रशासन तसेच वाहतूक विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व हायवे प्राधिकरणाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून बॉक्सबेल मध्ये उभी असलेली कायमस्वरूपी खाजगी वाहने अपघातास कारणीभूत ठरण्याची दाट शक्यता आहे.

तसेच मुळातच हा बॉक्सवेल चुकीचा आणि खूप अरुंद तसेचं उंचीला देखील कमी असल्याने एस. टी. महामंडळाच्या गाड्यांना वाहने वळवताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तर एस. टी. चा टप बॉक्सवेलला लागत असल्याने शिवशाही सारख्या गाड्या वळवताना अडचण निर्माण होत असल्यामुळे खारेपाटण एस. टी. बस स्थानकात गाड्या न येता त्या परस्पर महामार्गावरून पुढे जात आहे. त्यामुळे खारेपाटण येथील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व परिणामी खाजगी वाहनाने आपल्या घरी जावे लागत आहे. तरी याबाबत संबधीत प्रशासनाने तातडीनं लक्ष देऊन खारेपाटण येथील बॉक्सवेल मधील खाजगी वाहने त्वरित हटवून बॉक्सवेल वाहतुकीस मोकळा करवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये यांनी केली आहे.

error: Content is protected !!