आरोग्य हीच खरी संपत्ती- फिजा मकानदार यांचे आदिवासी समाजातील महिलांना आवाहन

भटके विमुक्ती दिन नारूळ कातकरी वस्ती येथे उत्साहात साजरा

महिलांसाठी आरोग्य जनजागृती व सॅनेटरी पॅड वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : ३१ ऑगस्ट रोजी नारूळ कातकरी वस्ती येथे भटके विमुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन इकोनेट संस्था पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला संस्थेच्या सिंधुदुर्ग प्रतिनिधी फिजा मकानदार व जयराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या दिनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महिलांसाठी आयोजित केलेले विशेष आरोग्य मार्गदर्शन सत्र. फिजा मकानदार यांनी महिलांना योग्य आहार, स्वच्छता, मातृ आरोग्य, मासिक पाळी दरम्यान घ्यायची काळजी तसेच दैनंदिन जीवनशैलीतील आवश्यक बदल याबाबत सविस्तर माहिती दिली. महिलांनी या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

फिजा मकानदार यांनी “सशक्त समाजासाठी प्रथम महिलांचे आरोग्य सक्षम असणे आवश्यक आहे”, असा संदेश देत महिलांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी महिलांना मोफत सॅनेटरी पॅडचे वाटप करून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमामुळे महिलांना आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून समाजातील नागरिकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारूळ ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!