शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांनी घेतली दखल
७ सप्टेंबर रोजी नवी मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रस्तरीय ‘प.पू. सानेगुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येते. यंदा या पुरस्कारासाठी वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक मंदार सदाशिव चोरगे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत कलासाधना सामाजिक संस्थेच्या वतीने ‘प.पू. सानेगरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ साठी त्यांची निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक या स्वरूपात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दि.०७ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी १० वाजता कराडी समाज हॉल, कामोठे, नवी मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. मंदार चोरगे यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.












