तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

देवगड (प्रतिनिधी) : ‘गणपती बाप्पाच्या आरतीसोबत व्यसनमुक्तीची आरतीही होऊ दे’, या विचाराने प्रेरित होऊन खवळे महागणपती ट्रस्टने सामाजिक जाणीवेचा अनोखा उपक्रम राबवला. नशाबंदी मंडळ, व्यसनमुक्ती सल्ला केंद्र गोपुरी आश्रम, सामाजिक न्याय विभाग, जि. प. समाजकल्याण विभाग सिंधुदुर्ग आणि नशामुक्त भारत यांच्या सहकार्याने व्यसनमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प घेऊन २१ दिवस चालणाऱ्या महागणपती उत्सवाला नवा सामाजिक आयाम मिळाला. ट्रस्टचे अध्यक्ष सुर्यकांत खवळे यांनी सांगितले, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही दरवर्षी या उपक्रमाला चालना देऊ. व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी आमचा सातत्याने सहभाग राहील.

यावेळी आरती आणि भजनासाठी जमलेल्या तरुण भक्तांनी बाप्पाच्या साक्षीने व्यसनमुक्त राहण्याचा व इतरांनाही व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केला. या वेळी नशाबंदी मंडळाच्या अर्पिता मुंबरकर म्हणाल्या, गेल्या पंधरा वर्षांत व्यसनमुक्ती मोहिमेत अनेक शासकीय, निमशासकीय, पोलिस, आरोग्य व शैक्षणिक यंत्रणांचे तसेच इतर सामाजिक संस्था, संघटनांचे सहकार्य लाभत असते. या उपक्रमांत धार्मिक संस्थांचा सहभाग ही अत्यंत प्रेरणादायी बाब असून अशा संकल्पामुळे युवकांमध्ये व्यसनाला नकार देण्याची ताकद निर्माण होईल.
आरतीनंतर प्रसादाबरोबर व्यसनमुक्ती शपथेचा प्रसाद वाटला गेला. उपस्थितांनी व्यसनमुक्त राहून समाजात जनजागृती करण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमात नशाबंदी समिती सदस्य रंजना कदम, खवळे महागणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुर्यकांत खवळे, कार्यवाह अक्षय खवळे, खजिनदार विनय खवळे यांच्यासह ग्रामस्थ, युवावर्ग व ट्रस्ट मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
“बाप्पाच्या दरबारात घेतलेला व्यसनमुक्तीचा संकल्प हीच खरी आरती आहे,” असा सूर या उपक्रमातून उमटला.













