21 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक पोलीस आणि एलसीबी कडून कारवाई
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाणे हद्दीत 21 ऑगस्ट पासून 5 सप्टेंबर या 16 दिवसांच्या कालावधीत अवैध दारू, जुगार, एनपीडीएस, वाळूचोरी चे मिळून एकूण 23 गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 21 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कणकवली पोलीस ठाण्यातील स्थानिक पोलीस आणि एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरात मटका अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात तीव्र मोहीम उघडल्याचे दिसून येत आहे. 21 ऑगस्ट पासून कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी, गोवा बनावटीची अवैध दारू, एन पी डी एस अंतर्गत गांजा ,अंमली पदार्थ बाळगणे, मोबाईलवर ऑनलाईन मटका जुगार, वाळू चोरी आदी गुन्ह्यांबाबत कडक पावले उचलली आहेत. अवैध दारू विरोधात दाखल एकूण 18 गुन्ह्यांपैकी कणकवली पोलीस ठाण्याकडून 12 गुन्ह्यात 5 लाख 11 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एलसीबी कडून दाखल 6 गुन्ह्यांत 10 लाख 88 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पालकमंत्र्यांनी मटका अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर दाखल गुन्ह्यानंतर कणकवली पोलिसांनी आणखी एक मटका जुगार चा गुन्हा दाखल करत रोख रक्कमेसह 12 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गुटखा विक्रीविरोधात कणकवली पोलीसानी दोन गुन्हे दाखल करून 22 हजार 145 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एलसीबी कडून गांजा बाळगल्या विरोधात 1 गुन्हा दाखल करून 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. तसेच कणकवली पोलिसांकडून विना परवाना वाळू वाहतूक केल्याबद्दल वाळू चोरी विरोधात 1 गुन्हा दाखल करण्यात आला असून वाळू आणि डंपर असा 5 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.












