“मागणी आता नाही काही, वरदहस्त असू दे | अन् पुढच्या वर्षी लवकर येss”– भक्तीभावाने गणरायाला निरोप !

फोंडाघाट मध्ये उदंड उत्साहात गणेशोत्सवाची गणेश विसर्जन मिरवणुकीने सांगता !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेले ११ दिवस संततधार वारा- पाऊस,प्रचंड वाढलेली महागाई, वाहतुकीची दुरावस्था, खड्ड्यांचा सुकाळ, प्रवासाचा विलंब, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष अशा असंख्य अडचणीवर मात करून, फोंडाघाट अन् कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. गौरी गणपती विसर्जनानंतर संततधार असल्याने, उगवाई नदी दुथडी भरून वाहत होती. मात्र गेले तीन दिवस पावसाने दडी मारल्याने व पात्रातील कोंडी गाळाने भरल्यामुळे, मूर्ती विसर्जनाला बाधा येत होती. अर्थात ग्रामपंचायतीने घाटाची स्वच्छता करताना, पाण्याची साठवण योग्य रीतीने होईल हे पाहणे आवश्यक होते. मात्र रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या विसर्जन मिरवणुकी करिता लाईट ची व्यवस्था योग्य करण्यात आली होती.

आज अनंत चतुर्दशी– अकराव्या दिवशी घरोघरी फोंडाघाट मध्ये पार्थिव गणेशाची उत्तरपूजा मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाल्यानंतर घरची आरती कुटुंबा समवेत उत्साहात पार पडली. आणि बाप्पा परतीच्या प्रवासाला निघाले.कोणी रिक्षा,टेम्पो, चार चाकी, ट्रक मधून आपापल्या गणेश मूर्तीला उगवाई घाटापर्यंत तर बाजारपेठेतील बाप्पा सजवलेल्या वाहनांमधून स्पीकरवर गणेशाच्या गाण्यांनी मिरवणुकीने घाटापर्यंत येत होते. वाटेत गणपती बाप्पा मोरयाss पुढच्या वर्षी लवकर याsss च्या घोषणांनी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत वातावरण भारलेले होते. प्रत्येक जण हात जोडून “मागणी आता नाही काही, वरदहस्त असू दे | अन पुढच्या वर्षी लवकर येss अशी विनवणी करीत होता.

नेहमीप्रमाणे घाटावर गणेश मूर्ती एका ओळीत ठेवून सार्वजनिक आरती करण्यात आली. सर्वांना सुखशांती आणि उन्नतीसाठी सांगणे (गाऱ्हाणे) करून गणेश मूर्ती एकापाठोपाठ एक उगवाई नदीपात्रात जड अंतकरणाने विसर्जित करण्यात आल्या.आणि प्रत्येकाने आणलेल्या लाह्या,फळांच्या फोडी,खव्याचे मोदक, पेढे यांचा प्रसाद एकत्रित करून आलेल्या भाविकांना ‘ निरोपाचा प्रसाद ‘ म्हणून वाटण्यात आला…

श्रीसदस्यांचा स्तुत्य उपक्रम
यावेळी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान – फोंडा येथील श्रीसदस्यांनी गणेश विसर्जन स्थळ निर्माल्य संकलन करून समाजहित लक्षात घेऊन आणि नदी प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षणासाठी समाजोपयोगी उपक्रम राबविला. त्यामुळे निर्माल्य कचरा एकत्रित साठवला गेला. यासाठी श्रीसदस्य धीरज हुंबे,दीपक शिंदे, मंगेश परब, विकास वरूणकर, बाबुराव लांबोरे, निलेश फाले, विठोबा म्हसकर, कानू शेळके, मनीष शिंदे,आशिष शेळके, निश्चय हुंबे ,शैलेश मिराशी, इत्यादींनी सहभाग घेतला,या उपक्रमाचे सर्व भाविकांनी कौतुक केले …

अखेर रात्री उशिरापर्यंत फोंडाघाट पंचक्रोशीतील गणेश विसर्जन मिरवणुका फटाक्यांच्या आतषबाजीत,गुलाल उधळणीत, ढोल ताशांच्या निनादात, नृत्याविष्कारात आणि गणपतीच्या जयजयकारात उदंड उत्साहात सुरू होत्या….

error: Content is protected !!