महिला सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाची महत्वाकांक्षी मोहिम आता सिंधुदुर्गात

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सिंधुदुर्गात मोफत तपासण्या व आरोग्य सेवा उपलब्ध

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत केंद्र शासनाची अत्यंत महत्वांकाक्षी “स्वस्थ नारी सशक्त परीवार मोहिम” राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये महिला व बालकांकरीता विशेष तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे होणार असून याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंबाच्या, समाजाच्या तसेच संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी केंद्रस्थानी आहे. त्यानुषंगाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी समाप्त होणारे “स्वस्थ नारी सशक्त परीवार मोहिम” हे अभियान आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत सुरु करण्यात येत आहे. हे अभियान महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारतर्फे साजरा करण्यात येणाऱ्या पोषण महिन्याशी जुळवून राबविण्यात येणार असून या अभियानाचा राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभ पंतप्रधान यांच्या शुभहस्ते मध्य प्रदेशातील इंदौर येथून करण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय कुडाळ, जिल्हा रुग्णालय व शासकिय वैद्यकिय महाविद्यालय या संस्थांमध्ये महिला व बालकांकरीता विशेष तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियाना दरम्यान असंसर्गजन्य रोग तपासणी शिबिरे (मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग), मोफत चष्मा वाटपासह नेत्र तपासणी शिबिरे, दंत तपासणी शिबिरे, माता आणि बाल आरोग्य शिबिरे (प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण), महिला आणि बालकांसाठी पोषण जागरुकता सत्रे, आयुष आणि योग शिबिरे, क्षयरोग जागरुकता आणि तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, अवयवदान प्रतिज्ञा शिबिरे, मोफत औषध वितरण शिबिरे, निदान शिबिरे (पॅथॉलॉजी, एक्स-रे, ईसीजी), कर्करोग जागरुकता आणि तपासणी शिबिरे, मानसिक आरोग्य समुपदेशन शिबिरे, व्यसनमुक्ती जागरुकता सत्रे, किशोरवयीन आरोग्य सत्रे, शालेय आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता आणि स्वच्छता जागरुकता शिबिरे ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर आरोग्य मेळावे/प्रदर्शने, दुर्गम भागांसाठी टेलिमेडिसिन सल्लामसलत, आयुष्मान कार्ड, त्र्य वदंना कार्ड/आभा कार्ड तयार करणे.

१७ सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली, १८ रोजी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय, १९ रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय, २० रोजी उपजिल्हा रुग्णालय शिरोडा, २२ रोजी ग्रामिण रुग्णालय मालवण, २३ रोजी महिला व बाल रुग्णालय कुडाळ, २४ रोजी ग्रामिण रुग्णालय वैभववाडी, २५ रोजी जिल्हा मेडिकल कॉलेज, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामिण रुग्णालय देवगड, २६ रोजी ग्रामिण रुग्णालय कुडाळ, २७ रोजी ग्रामिण रुग्णालय पेंडुर कट्टा, २९ रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली, ३० रोजी महिला व बाल रुग्णालय कुडाळ, १ ऑक्टोबर रोजी ग्रामिण रुग्णालय वेंगुर्ला, २ रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी अशाप्रकारे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

error: Content is protected !!