सलग दुसऱ्या वर्षी डिजिटल अहवालाची परंपरा कायम; सहकार क्षेत्रात नाविन्यपूर्ण पाऊल
आचरा (प्रतिनिधी) : कागदाचा वापर कमी करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याच्या उद्देशाने मालवण तालुक्यातील नाथगोसावी फळे, भाजीपाला सहकारी संस्था मर्यादित, चिंदर-सडेवाडी या संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी आपला वार्षिक अहवाल डिजिटल स्वरूपात प्रसिद्ध केला आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सहकार क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे.
कागदाची बचत, पर्यावरणाचे संवर्धन
डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणपूरक कार्य करण्याच्या उद्देशाने संस्थेने वार्षिक अहवाल छापण्याऐवजी तो क्यूआर कोडद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे छपाईचा खर्च वाचणार असून कागदाची बचत आणि वृक्षसंवर्धनालाही हातभार लागणार आहे.
संस्थेचा ४२ पृष्ठांचा आणि १३ एमबी आकाराचा वार्षिक अहवाल सदस्य व ग्रामस्थांना सहज उपलब्ध होणार आहे. मोबाईलमधील स्कॅनर किंवा गुगल लेन्सच्या साहाय्याने क्यूआर कोड स्कॅन करून अहवाल वाचता येणार आहे. त्यामुळे संस्थेची माहिती अधिकाधिक सदस्यांपर्यंत सहज पोहोचण्यास मदत होणार आहे.
सहाय्यक निबंधकांकडून उपक्रमाचे कौतुक
संस्थेच्या या नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक उपक्रमाची दखल घेत सहकारी संस्था मालवणचे सहाय्यक निबंधक सुनील पांडुरंग मरभळ, सहकारी अधिकारी श्रेणी-२ तथा अधिन सहाय्यक निबंधक सुनीता आशिष भोगले आणि गाबीत समाज पतसंस्था मालवणचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल मालडकर यांनी संस्थेचे विशेष अभिनंदन केले.
इतर सहकारी संस्थांनीही अशा प्रकारचा डिजिटल उपक्रम राबविल्यास छपाईच्या खर्चात मोठी बचत होईल आणि पर्यावरण रक्षणालाही हातभार लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
इतर संस्थांनाही मार्गदर्शनाची तयारी
‘चला, कागद वाचवूया, झाडे वाचवूया आणि डिजिटल सहकाराकडे एक पाऊल पुढे टाकूया!’ हा प्रेरणादायी संदेश देत संस्थेचे सचिव स्वप्नील सूर्यकांत गोसावी आणि मंगेश गोसावी यांनी इतर संस्थांनाही या उपक्रमाबाबत मार्गदर्शन व सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
नाथगोसावी सहकारी संस्थेच्या या उपक्रमामुळे सहकार क्षेत्रात डिजिटल कार्यपद्धती आणि पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श निर्माण झाला आहे.











