संकटात सापडलेल्या सत्यवती सुतार यांना खारेपाटण ग्रामपंचायतीचा मदतीचा हात!

वादळी वाऱ्यामुळे घर जमीनदोस्त; वृद्ध सत्यवती सुतार यांना ग्रामपंचायतीकडून आर्थिक मदत

खारेपाटण (प्रतिनिधी) : संकटाच्या काळात माणुसकीचा हात पुढे करणारी खारेपाटण ग्रामपंचायत पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबाच्या मदतीला धावून आली आहे. खारेपाटण सुतारवाडी येथील सत्यवती सहदेव सुतार यांच्या घराचे मे २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्या राहत्या घरावर मोठे झाड कोसळल्याने संपूर्ण घर जमीनदोस्त झाले होते. या दुर्दैवी घटनेमुळे सुतार कुटुंबावर मोठे संकट कोसळले.

सत्यवती सुतार यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून वृद्धापकाळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या पदरात असलेली विधवा मुलगीदेखील सतत आजारी असते. घरात कमावती व्यक्ती नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत घर कोसळल्याने या मायलेकींच्या अडचणीत आणखी भर पडली.

या कुटुंबाची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन खारेपाटण ग्रामपंचायत सरपंच महेंद्र गुरव यांनी पुढाकार घेऊन त्यांना ग्रामपंचायत निधीतून आर्थिक मदतीचा हात दिला. संकटात सापडलेल्या कुटुंबाला आधार देत ग्रामपंचायतीने दाखविलेली संवेदनशीलता आणि माणुसकी निश्चितच कौतुकास्पद आहे. सरपंच महेंद्र गुरव यांच्या हस्ते आर्थिक मदत सत्यवती सुतार यांना सुपूर्त करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले, सुधाकर ढेकणे, ग्रामपंचायत अधिकारी विशाल वरवडेकर उपस्थित होते.

error: Content is protected !!