आमदार सतेज पाटील यांचे पत्रकारांना आवाहन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत साडेपाच लाख शेतकऱ्यांनी दिलेल्या कौलाचा अनादर होत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील सर्व संपादक व पत्रकारांना खुले पत्र लिहून सहकार वाचवण्यासाठी वास्तव जनतेसमोर मांडण्याचे आवाहन केले आहे.
२५ पैकी १३ जागा जिंकून समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही, २९ ऑक्टोबरच्या अध्यक्ष निवड सभेला महायुतीचे १२ संचालक जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. त्यामुळे गणपूर्तीअभावी सभा तहकूब करून प्रक्रिया अडवण्यात आली, असा आरोप त्यांनी पत्रात केला.
केवळ बहुमतासाठी नियम बदलणे किंवा शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन संख्याबळ फिरवणे म्हणजे लोकशाहीची गळचेपी असल्याचे सांगत, विरोधी संचालकांनी शेतकऱ्यांचा कौल स्वीकारून पुढील सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. याविरोधात कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा उभारणार असल्याचा निर्धारही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.












