वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्था, मुंबई संचलित अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल तसेच कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय, वैभववाडी येथील कला शिक्षक मंदार चोरगे यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे यांच्यावतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ साठी निवड झाली आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच कला शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यामध्ये दिलेले महत्त्वपूर्ण योगदान या कार्याची दखल घेऊन त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीमुळे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र दत्ताराम रावराणे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.












