शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक कार्याची राज्यस्तरावर दखल
आचरा-चिंदर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
आचरा (प्रतिनिधी) : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले परिश्रम तसेच सामाजिक आणि संघटनात्मक कार्यातील सक्रिय सहभागाची दखल घेत शाळा चिंदर नंबर १ चे मुख्याध्यापक तथा आचरा केंद्रप्रमुख राजेंद्र प्रसाद गाड यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यावतीने ‘आयडॉल शिक्षक २०२६-२७’ या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रासह आचरा-चिंदर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजेंद्र प्रसाद गाड हे शाळा चिंदर नंबर १ येथे मुख्याध्यापक तथा आचरा केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे.
गावातील विविध मंडळांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांमध्ये ते सक्रिय सहभाग घेत असतात. अध्यापनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडताना शिक्षकांचे संघटन आणि विद्यार्थ्यांचे हित यांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या कार्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत मिळालेला ‘आयडॉल शिक्षक २०२६-२७’ हा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव करणारा आणि भविष्यातील वाटचालीस प्रेरणा देणारा ठरला आहे. या यशाबद्दल त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.












