कणकवली (प्रतिनिधी) : शाश्वत जीवनशैली खेड्यापाड्यात असते म्हणून खेड्यात चला असा मंत्र महात्मा गांधींनी दिला आणि त्याचे मूर्त स्वरूप अप्पासाहेब पटवर्धन यांनी निर्माण केलेल्या गोपुरी आश्रमाच्या रूपाने जगासमोर आले.
आज आपल्या देशाची जीवनशैली फारच विचित्र बनली आहे, अशावेळी अप्पासाहेबांच्या गोपुरी आश्रमाच्या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक असून आज अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त येथे उपस्थित झालेल्या प्रत्येक अप्पाप्रेमी कार्यकर्त्यांने प्रयत्न करावा असे आवाहन सुहास ठाकूर देसाई यांनी केले. सुहास ठाकूर देसाई यांनी आप्पासाहेबांच्या सानिध्यात गोपुरी आश्रमात बालपण व्यतीत केलेले आहे. त्यावेळच्या आठवणी देखील त्यांनी यावेळी सांगितल्या.
कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांची 132 वी जयंती गोपुरी आश्रमात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात आप्पा साहेबांच्या विचारांचा स्वतः अंगीकार करून पुढील जयंती दिना पर्यंत आप्पासाहेबांच्या विचारांचे दोन सहकारी तयार करण्याची शपथ यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांनी सर्वांना दिली. या जयंती कार्यक्रमात मोहन सावंत सर यांनी देखील आपले विचार मांडले. तर सुरेश रासम यांनी आप्पा साहेबांच्या जीवन कार्याविषयी माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमात एस डी गोवेकर, पत्रकार विजय गांवकर, भगवान लोके, बाळू मेस्त्री, व्ही के सावंत, विनायक सापळे, सुनील सावंत, गोपुरी आश्रमाचे कर्मचारी तसेच इतर आप्पासाहेब प्रेमी उपस्थित होते.












